सायखेडा उपबाजारात आदल्या दिवशी कांद्याला ५ पैसे प्रति किलो भाव मिळाल्याने अस्वस्थ शेतकऱ्यांचा रोष बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कांदा फेको आंदोलनाद्वारे बाहेर पडला. जिल्ह्यातील अनेक तहसीलदार कार्यालयांवर कांदे फेकण्यात आले. आंदोलनासाठी सडलेल्या कांद्याचा वापर केल्याने इगतपुरी तहसीलदार कार्यालयात दरुगधी पसरली. कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने त्यास हमी भाव द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. गडगडणाऱ्या कांद्याचा मुद्दा राजकीयदृष्टय़ा लाभदायी ठरणार असल्याने राष्ट्रवादीने त्याविरोधात आक्रमक होण्याचे धोरण स्वीकारले आहे.

साठविलेल्या उन्हाळ कांद्याला हंगामाच्या अखेरीस चांगले भाव मिळतील, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. एक तर भाव नाही आणि साठवल्याने वजनातही घट अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. सध्या प्रति क्िंवटलला केवळ ५०० ते ६०० रुपये सरासरी भाव मिळत असताना सायखेडा उपबाजारात दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला पाच पैसे किलो भाव जाहीर झाला. त्याचे संतप्त पडसाद कांदाफेक आंदोलनाद्वारे पाहावयास मिळाले. कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तालुकावार ‘कांदा फेको’ आंदोलन केले. भाव मिळत नसल्याने अस्वस्थ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केली.

या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर, सर्व तहसीलदार कार्यालयांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या स्थितीत जिल्हाध्यक्ष पगार यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालयावर कांदे फेकण्यात आले. इतर ठिकाणी ही आंदोलने झाली. कांद्याला अडीच हजार रुपये हमीभाव जाहीर करण्याची गरज आहे.

कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार तातडीने हस्तक्षेप करते. तसाच हस्तक्षेप भाव कोसळल्यावर करावा याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. इगतपुरी तहसील कार्यालयात सडलेला कांदा फेकण्यात आल्याने दरुगधी पसरली होती. तहसीलदार अनील पुरे यांना कांद्याची माळ भेट देण्यात आली.

भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही ठिकाणी शेतकरी या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले.