11 July 2020

News Flash

कांदे व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी

एप्रिल, मेमध्ये उत्पादित झालेला आणि नंतर चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर दरवाढ ही नेहमीची बाब आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

काम आज पूर्ण होण्याची शक्यता, दरवाढीची अन्य कारणे दुर्लक्षित

व्यापारी कमी भावात खरेदी केलेला कांदा टंचाईच्या काळात वारेमाप दराने विकून नफेखोरी करत असल्याच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि येवला भागातील ११ व्यापाऱ्यांच्या कार्यालयातील व्यवहारांची सुरू केलेली तपासणी मंगळवारीही सुरू आहे. बुधवापर्यंत हे काम पूर्णत्वास जाण्याचा प्राप्तिकर विभागाचा अंदाज आहे. कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार, साठवणूक आदींचा तपशील प्रामुख्याने तपासला जात आहे. दुसरीकडे कांदा दरवाढ का होते, याची कारणमीमांसा मात्र शासकीय पातळीवर योग्य प्रकारे होत नसल्याचे चित्र आहे.

एप्रिल, मेमध्ये उत्पादित झालेला आणि नंतर चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर दरवाढ ही नेहमीची बाब आहे. दिवाळीनंतर नवीन लाल कांदा येईपर्यंत चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा गरज पूर्ण करतो. यंदा दिवाळीच्या दीड महिना आधीच कांद्याचे दर गगनाला भिडल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी करत तो देशाबाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली. सोबत व्यापाऱ्यांना ५०० क्विंटलपेक्षा अधिक साठवणूक न करण्याची मर्यादा घातली. म्हणजे व्यापारी घाऊक बाजारात कितीही कांदा खरेदी करू शकतात, मात्र त्यांना तो लगेच देशांतर्गत बाजारात विकावा लागेल. खरेदी केलेल्या ५०० क्विंटलपर्यंत त्यांना साठवणुकीची मुभा दिली गेली. या घटनाक्रमानंतर काही दिवस भाव गडगडले. परंतु, परतीच्या पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचे आगमन लांबणीवर पडले. उन्हाळ कांदा संपुष्टात येत असताना नवीन कांदा पुरेशा प्रमाणात येत नसल्याने कांद्याचे भाव पुन्हा नवीन उंची गाठू लागले. सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ५२०० रुपये दर मिळाले. मंगळवारी गुरू नानक जयंतीनिमित्त बाजार समितीला सुट्टी होती. यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाले नाहीत. दिल्ली, मुंबईसह महानगरांमध्ये कांद्याने ८० ते १०० रुपये किलोचे दर गाठले. दोन वर्षांपूर्वी अशी स्थिती निर्माण झाल्यावर केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र उगारले होते. जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमधील सुमारे ४०० ते ५०० कांदा व्यापारी आहेत. संबंधितांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून दर वाढविले जातात, असा संशय आहे. निर्यातबंदी आणि साठवणुकीवर मर्यादा घालूनही दरवाढ होत असल्याने सरकारने पुन्हा व्यापाऱ्यांकडे आपला मोर्चा वळविला. प्राप्तिकर विभागाच्या २० पथकांनी लासलगाव येथील नितीन जैन, सुरेशचंद्र जैन, अजित भंडारी, प्रवीण कदम, रमेशचंद्र अटल यांच्यासह एकूण ११ मोठय़ा व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले.

नवीन कांदा येईपर्यंत आवक कमीच

नवीन लाल कांदा दिवाळीनंतर बाजारात येऊ लागतो. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे लाल कांद्याचे आगमन लांबणीवर पडले. परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार लेट खरीप कांद्याचे एकूण ५० हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ४० टक्के क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना नवा कांदाही पुरेसा येत नसल्याने बाजारात एकूणच आवक कमालीची घटली आहे. लासलगाव बाजारात मागील सोमवारी उन्हाळ कांद्याची २०७८ आणि लाल कांद्याची १४९ क्विंटल आवक झाली होती. इतर बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळे चित्र नाही. नव्या कांद्याची आवक वाढल्यानंतर दर नियंत्रणात अवघड असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:41 am

Web Title: onion traders investigation akp 94
Next Stories
1 सोनसाखळी चोरटय़ांना मोक्का
2 आदित्य ठाकरेंनी आश्वस्त केल्यानंतरही शेतकऱ्याची आत्महत्या
3 गुन्हे वृत्त : युवतीच्या हातातून भ्रमणध्वनी खेचून पलायन
Just Now!
X