मनमाड : आवक घटल्यानेच कांदा नवनव्या विक्रमांनी गवसणी घालत आहे. परिणामी आधी हॉटेलमधून नंतर भाज्यांमधून व आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. कांद्याचे भाव वाढत असल्याने हॉटेल, उपाहारगृह आणि खानावळीच्या टेबलवरून कांदा गायब झाला. आता कांद्याऐवजी काकडी आणि कोबीपत्ता दिला जात आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढत असताना अत्यल्प प्रमाणात शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याने मंगळवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त आठ हजार रुपये क्विंटल असा उच्चांकी दर गाठला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा सुखावला आहे. परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार दिला आहे.

सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सहा हजार ६६६ रुपये क्विंटल असलेल्या कांद्याच्या भावात मंगळवारी तब्बल दीड हजारांनी उसळी घेतली आहे. सोमवारी मनमाड  कृउबा समितीत लाल कांद्याची १८०० क्विंटल आवक होऊन १५०० ते ६६६६ सरासरी पाच हजार ५०० रुपये क्विंटल असा भाव निघाला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली. मंगळवारी सुमारे तीन हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन १५०० ते ८००० सरासरी ६२०० रुपये क्विंटल इतका भाव निघाला. सरासरी बाजारभावात सुमारे ७०० रुपयांची वाढ झाली. आवक कमी असल्याने आणि देशांतर्गत मागणी वाढल्याने कांद्याचे भाव उच्चांकी प्रस्थापित करत आहे. सध्या बाजारपेठांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक जवळपास संपुष्टात आली आहे.  शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा आता संपत आला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. कांद्यावर रोगाचा प्रादुर्भावही झाला. परिणामी त्याचीही आवक फारशी वाढलेली नाही. पण देशांतर्गत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची आवक मागणी टिकून आहे त्यामुळे या कांद्याच्या दरात वाढ कायम आहे.

अवकाळी पावसाच्या तडाख्याने यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटले. पुढील दीड ते दोन महिने भाव असेच तेजीत राहतील असा अंदाज व्यक्त होत आहे.  मात्र कांद्याची ही विक्री उसळी आर्थिकदृष्टय़ा जेरीस आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरत आहे.