22 February 2019

News Flash

शेतातील कांदा राखण करण्याची वेळ

कधी काळी देवळा तालुका हा दर्जेदार, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध होता.

देवळा तालुक्यात वरवंडी येथील याच शेतातील खळ्यातून चोरटय़ांनी २० ते २५ क्विंटल कांदा लंपास केला. (छाया- महेश सोनकुळे) 

चोरीच्या घटनांमुळे  शेतकरी चिंताग्रस्त

तालुक्यातील वरवंडी येथील शेतकरी पांडुरंग शिंदे यांच्या शेतातून २० ते २५ क्विंटल पोळ कांदा चोरीस गेल्याची घटना घडल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. तालुक्यात कांदे चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे शेतकरी त्रस्तावले असून शेतात त्याची राखण करण्याची वेळ आली आहे.

कधी काळी देवळा तालुका हा दर्जेदार, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. त्या काळात शेतातून डाळिंब चोरीला जाण्याच्या घटना नेहमी घडत असत. कालांतराने तेल्या, मर रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. यामुळे शेतकरी पुन्हा कांदा लागवडीकडे वळले. ज्या भागात डाळिंबाच्या बागा आहेत, तिथे चोरीचे प्रकार घडत आहेत. मागील चार ते पाच महिने कांदा भाव तेजीत राहिल्यामुळे लहान-मोठय़ा सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी देशातील इतर भागातून कांद्याची आवक वाढल्यावर अडीच हजार रुपयांवर असणारे दर सरासरी १४०० रुपयांपर्यंत खाली आले होते. या पाश्र्वभूमीवर, केंद्र सरकारने ७०० डॉलरवर असणारे किमान निर्यात मूल्य हटवून निर्यातीचा मार्ग प्रशस्त केला.

या निर्णयामुळे कांद्याच्या भावात चांगलीच वधारणा होऊन ते अडीच हजार रुपयांवर पोहोचले. कांदा भाव वधारल्यापासून ते चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. वरवंडी येथील पांडुरंग शिंदे या शेतकऱ्याच्या शेतातून चोरटय़ांनी चारचाकी वाहन आणून २० ते २५ क्विंटल कांदा चोरून नेला. बाजारभावानुसार या शेतकऱ्याचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या घटनाक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतातील कांदा राखण करण्याची वेळ आली आहे. गुंजाळनगर येथील अलका गुंजाळ या विधवा शेतकरी महिलेच्या शेतातून आठवडाभरापूर्वीच ४० क्विंटल कांदा चोरीला गेला होता.

दरवाढीचा फटका

शेतातून काढलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेशी व्यवस्था नसते. खळ्यात तो झाकून ठेवला जातो. आजवर त्याची राखण करण्याची वेळ कधी आलेली नव्हती. परंतु, जेव्हा त्याचे दर गगनाला भिडतात, तेव्हा चोरटय़ांची ते लंपास करण्याकडे नजर असल्याचे देवळा तालुक्यातील घटनांवरून उघड झाले आहे. शेतात काबाडकष्ट करून पिकवलेल्या कांद्याची चोरी होऊ नये म्हणून आता अनेकांना काढणीनंतर शेतात त्याची राखण करण्याची वेळ आली आहे.

First Published on February 9, 2018 12:34 am

Web Title: onions stolen from nashik farmer