कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते बंद केल्याने नाराजी

नाशिक : यंदा करोनामुळे सर्वच मंदिरे बंद असल्याने शिवभक्तांना त्र्यंबकसह नाशिकमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवारी मंदिराबाहेरूनच दर्शन घेत माघारी फिरावे लागले. त्र्यंबक देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली.

तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकला मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने राज्य परिवहन, जिल्हा प्रशासन, त्र्यंबक नगरपालिका, आरोग्य विभाग या सर्व यंत्रणेची दरवर्षी  लगबग सुरू होत असे. यंदा करोनामुळे त्यास विश्रांती मिळाली आहे. श्रावणात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी दरवर्षी होते. यंदा प्रदक्षिणेसह बंदी असल्याने भाविकांची निराशा झाली. राज्य परिवहनचे उत्पन्नही त्यामुळे बुडाले. त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी दुपारी त्र्यंबकेश्वर मंदिरातून पालखी कुशावर्तावर आली. तेथे त्र्यंबकराजाच्या सोन्याच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. देवस्थानच्या वतीने याच काळात त्र्यंबकराजाचे दर्शन ऑनलाइन घेण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे श्रावणासह इतर वेळी भाविकांना आता २४ तास ऑनलाइन दर्शन घेता येणार असून देवस्थानच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती देण्यात आली आहे.  बंदी असली तरी भाविकांची गर्दी होईल यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद  होते.