विद्यार्थ्यांमध्ये अतिचंचलता वाढली, नेटवर्क नसल्यामुळेही अडचण

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा ‘ऑनलाइन’ पद्धतीने झाला असला तरी शिक्षणाची ही पद्धत शिक्षक आणि पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अतिचंचलता वाढली असून काही ठिकाणी शिक्षिकांना अश्लील संदेश पाठविण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. यामुळे पालक तसेच शिक्षक धास्तावले आहेत

यंदाच्या शैक्षणिक वर्षांवर करोनाचे सावट असल्याने जून महिन्यात ऑनलाइन पद्धतीने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. इंग्रजी तसेच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये काही पालकांचा रेटा वाढल्याने तसेच पालकांकडून शैक्षणिक वर्षांचे शुल्क आकारण्यासाठी संस्थांकडून ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यास सुरुवात झाली. सरकारी शाळांमध्ये ‘दीक्षा’ अ‍ॅपच्या माध्यमातून वेगवेगळे संकेतस्थळ देत विद्यार्थ्यांना ठरावीक धडय़ांची माहिती दिली जात आहे.

खासगी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये झुम अ‍ॅप, गूगल मीट यांच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासवर्ग सुरू  झाले आहेत. ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले हे वर्ग पालकांसाठी आर्थिकदृष्टय़ा महागडे ठरत आहेत. एका घरात दोन विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत असल्यास कामाच्या वेळा सांभाळून त्यांना भ्रमणध्वनी देणे, त्या वेळेत ते अभ्यास करत आहेत की नाही यासाठी खडा पहारा देण्याची वेळ पालकांवर आली आहे. भ्रमणध्वनी कंपनीकडून देण्यात येणारा एक जीबी, दोन जीबी डाटा विद्यार्थी अवघ्या दोन ते तीन दिवसांत संपवत आहेत. काही ठिकाणी संपर्कच होत नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे.

काही मुलांकडून अभ्यासाच्या नावाखाली भ्रमणध्वनीचा गैरवापर होत असून पालकांचे समाजमाध्यमांवरील वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांसंदर्भातील संदेशाची देवाणघेवाण ‘व्हॉट्सअप’मुळे होत असल्याने महिला शिक्षकांच्या कौटुंबिक अडचणीत भर पडली आहे. मुळात शाळेने घरून काम करण्याची मुभा दिली आहे. इतर वेळी घरातील कामे आणि शाळेच्या वेळा सांभाळून कामे होत होती. सध्या टाळेबंदीमुळे गृहसेविका किंवा अन्य मदतनीसांना परवानगी नाही. संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. यामुळे घर आणि काम यावर तारेवरची कसरत होत असताना पालकांकडून कधीही दूरध्वनी करून विद्यार्थ्यांला हा मुद्दा समजला नसल्याचा सूर लावत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चौकशी करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी तर महिला शिक्षिकेला अश्लील संदेश पाठवले. यामुळे काही ठिकाणी वादाला सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना भ्रमणध्वनी, लॅपटॉपचे व्यसन

सध्याच्या परिस्थितीत काही गोष्टी शक्य नाही; परंतु त्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शोधण्यात आला असला तरी खऱ्या शाळेची मजा त्यात नाही. हे शिक्षण नववी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असू शकेल. लहान मुलांसाठी तितकेसे ते महत्त्वाचे नाही. घरातून बाहेर पडणे, मित्र-मैत्रिणींना भेटणे, खेळणे, पळणे, हसणे, मस्ती, एकत्र डबा खाणे या सर्व गोष्टींमध्ये मुले काही शिकत असतात. त्यांच्या नैसर्गिक वाढीचा तो भाग आहे. सध्या ते त्यांना मिळत नाही. सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे मुलांना भ्रमणध्वनी आणि लॅपटॉपचे व्यसन लागले आहे. तासन्तास भ्रमणध्वनी किंवा लॅपटॉपसमोर बसून त्यांच्यात डोकेदुखी, चिडचिडेपणा वाढला आहे, जे त्यांच्या एकंदरीत वाढीस आणि आरोग्यास घातक आहे. हे कमी करण्यासाठी शाळेने आणि पालकांनी प्रयत्न करायला हवे.

– डॉ. हेमंत सोननीस (मानसोपचारतज्ज्ञ)