News Flash

साडेचौतीस हजारपैकी केवळ ५०६ जणांना कर्जमाफी

पहिली यादी जाहीर; शेतकरी अस्वस्थ

पहिली यादी जाहीर; शेतकरी अस्वस्थ

नांदगाव तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होताच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. अर्ज केलेल्या ३४ हजार ४०० शेतकऱ्यांपैकी केवळ ५०६ जणांचीच दोन कोटी ९२ लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. त्याचीही पुढील दोन-तीन दिवस पडताळणी होणार असून त्यानंतर ती रक्कम खात्यावर जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चलबिचल वाढली आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  त्यातही अनेक तांत्रिक अडचणींना  शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.  नांदगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १४ कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्या आहेत. अशा संवेदनशील परिसरात दोन दिवस सुटीचे असूनही जिल्ह्यतील सर्व जिल्हा बँक शाखेच्या अधिकाऱ्यांना सक्तीने बँकेत या ‘ग्रीन लिस्ट’च्या प्रतीक्षेसाठी तिष्ठत ठेवण्यात आले. तेथे याद्या पोहचल्याच नाहीत. अखेर सायंकाळी तालुका मुख्यालयात नांदगावला त्यांना या याद्यांसाठी बोलावण्यात आले. दोन दिवस सव्‍‌र्हर डाऊन असल्याचे कारण, नंतर चुकीच्या याद्या आल्याने याद्या देण्यास उशीर झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

वास्तविक ही योजना राबविताना सरकारने शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक केले. हे कंटाळवाणे काम पार करीत नांदगाव तालुक्यातील ३४ हजार ६०० शेतकऱ्यांनी अर्ज भरले. मात्र आज केवळ ५०६ शेतकऱ्यांचे दोन कोटी ९२ लाख रुपयेच आले. या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांच्या मर्यादेत काही अटी, निकषांना अधीन राहून कर्ज माफी देण्यात आली आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सहकार खात्याकडून तयार करण्यात आल्या. कर्जमाफी योजनेच्या संकेतस्थळावर सरकारकडून शेतकऱ्यांच्या नावाची यादी रविवारी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन यादीतील घोळ सुरूच आहे. त्यामुळे लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा आकडा अत्यंत मर्यादित स्वरूपाचा झाला आहे.

अर्ज भरलेल्यांपैकी पहिल्या यादीत तर अवघे सात टक्के शेतकरी बसल्याने गरजूंना धक्का बसला. त्याचीही पडताळणी सुरू असल्याने लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा आकडा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. हे पैसे सरकार आयसीआयसीआय  बँक शाखेत करणार असून येत्या दोन-तीन दिवसानंतर ते संबंधित जिल्हा बँक शाखेकडे आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकरी तसेच जिल्हा बँक या दोघांनाही कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकार वेडय़ात काढत आहे. कर्जमाफीपोटी जिल्हा बँकेला मिळालेले चार कोटी रुपये परस्पर जमा करून घेण्यात आल्याचे बँकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने सांगितले.

तांत्रिक अडचणी

अर्जाची तपासणी करून याद्या तयार करण्याचे काम ऑनलाइन सुरू आहे. या कामात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.  संपूर्ण कर्जमाफीचे आश्वसन देऊन सरकार सत्तेवर आले, पण अजूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही, या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा?   –पंढरीनाथ काकड, शेतकरी

सोसायटीनिहाय लाभार्थी

मनमाड ग्रामीण विभागात हिसवळ खुर्द ७५, खादगाव ६९ ,बेजगाव ४७, धोटाणे १६, अस्तगाव ४४, के.व्ही. बी. घुगे सोसायटी एक, मनमाड विकास सोसायटी ९५, मोहेंगाव ३९, पानेवाडी १३, पांझणदेव २१, कर्ही १ अशा ११ सोसायटयांमध्ये ४११ लाभार्थी शेतकरी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:27 am

Web Title: only 506 farmers get loan waiver benefits
Next Stories
1 मतदान यंत्रांमधील करामतच गुजरातमध्ये भाजपला वाचवेल
2 शैक्षणिक संस्थांच्या पन्नास शाळा असल्यास स्वायत्तता
3 सुरक्षारक्षकांच्या संख्येत कपात
Just Now!
X