नाशिक विभागात केवळ ७३३ स्थलांतरित मजूर

नाशिक : टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवासाची मुभा मिळाल्याने परराज्यात जाणारे महामार्ग स्थलांतरीत मजुरांनी ओसंडून वाहत असतांना या मजुरांच्या तात्पुरत्या निवासासाठी स्थापलेली निवारागृहे ओस पडू लागली आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या निवारागृहातील शेकडो मजूर आपल्या गावी मार्गस्थ झाले आहेत. सद्यस्थितीत विभागातील २४ निवारागृहात केवळ ७३३ स्थलांतरीत मजूर वास्तव्यास आहेत. नाशिक जिल्ह्य़ात तीन निवारागृहात सध्या ६० मजूर वास्तव्यास असून त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महापालिकेच्या १७ निवारागृहांमध्ये वास्तव्यास असणारे ८१५ मजूर आपापल्या गावी परतले असून सध्या निवारागृहात एकही मजूर नाही.

करोनाच्या पार्श्वभूमीवर, देशात मार्च अखेरीस टाळेबंदी जाहीर झाली आणि तेव्हांपासून हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल सुरू झाले. हाताला काम नसल्याने त्यांची बिकट स्थिती झाली. वाहतूक बंद असल्याने गावी जाण्याचे मार्ग बंद झाले. अशा परिस्थितीत मुंबईसह सभोवतालच्या परिसरातील हजारो मजूर पायी, खासगी वाहने, सायकल आदी साधनांनी मार्गस्थ झाले. यातील काहींना जिल्हा, महापालिकेच्या सीमेवर रोखण्यात आले. स्थलांतरीत मजुरांसाठी महापालिका, जिल्हा प्रशासनाने निवारागृहांची व्यवस्था केलेली होती. शेकडो मजुरांच्या राहण्यासोबत भोजनाची व्यवस्था तिथे करण्यात आली.  महापालिकेने आरोग्य तपासणी, योगा मार्गदर्शनाद्वारे त्यांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. महिनाभराहून अधिक काळ निवारागृहात वास्तव्य करणाऱ्या मजुरांची अस्वस्थता अखेरच्या टप्प्यात वाढू लागली. याच काळात रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रारंभीच १२५० मजूर भोपाळ, लखनौला रवाना झाले. रेल्वेगाडय़ांची संख्या तुलनेत कमी असल्याने नंतर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक अशा सर्व भागातून मजुरांचे मिळेल त्या साधनाने मोठय़ा संख्येने स्थलांतर सुरू आहे. पायी, खासगी वाहने, सायकल, अशा साधनांचा वापर करत हे तांडे महामार्गावरून मार्गस्थ होत आहेत. परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांमुळे शासन, महापालिकेने स्थापलेली निवारागृहे ओस पडली आहेत.

नाशिक विभागातील २४ निवारागृहात सध्या ७३३ मजूर वास्तव्यास आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीणमध्ये ६० मजूर (तीन निवारागृह), अहमदनगरमध्ये सर्वाधिक ५९९ मजूर (१९), जळगाव १० (एक), धुळे ६४ (एक) अशी संख्या आहे. या सर्व मजुरांच्या दैनंदिन भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

– राजाराम माने  (विभागीय आयुक्त, नाशिक

स्थलांतरीत मजुरांसाठी महापालिकेने १७ शाळांमध्ये निवारागृह तयार केली होती. महिनाभराहून अधिक काळ सुमारे ८१५ मजूर वास्तव्यास होते. स्थलांतरीत मजुरांचा सर्वाधिक ताण नाशिक महापालिकेवर होता. सर्व मजुरांची निवारागृहात यथायोग्य काळजी घेतली गेली. वैद्यकीय तपासणी, समूपदेशन, योगा मार्गदर्शन आणि मजुरांची प्रतिकार शक्ती वाढविण्याची दक्षता घेण्यात आली. प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर काहींना रेल्वेने तर काहींना बस, अन्य गाडय़ांनी त्यांच्या गावी पाठविण्यात आले. सध्या निवारागृहात एकही मजूर नाही.

– अर्चना तांबे  (उपायुक्त, महानगरपालिका)