किंमत कमी करुनही विक्रीसाठी काहीच फायदा नाही,  प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना ‘म्हाडा’तर्फे संधी

शहरातील वेगवेगळ्या भागांत उभारलेल्या प्रकल्पातील सदनिकांच्या किमतीत लक्षणीय घट करूनही म्हाडाला आतापर्यंत एकूण घरांपैकी केवळ निम्म्या घरांची प्रत्यक्षात विक्री करणे शक्य झाले आहे. एप्रिल महिन्यात म्हाडाने काढलेल्या सोडतीत ११३३ सदनिकांसाठी २६०० ग्राहकांनी रस दाखवला होता. काहींनी दोन किंवा अधिक अर्ज भरल्याने तसेच काहींना वित्तीय संस्थेकडून कर्ज न मिळाल्याने सदनिका खरेदी करणे शक्य झाले नाही. आता प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना सदनिका खरेदीची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कामटवाडे शिवारात १७८, तर मखमलाबाद शिवारात ४२ सदनिकांचा प्रकल्प हाती घेतला गेला आहे. आडगाव शिवारातील ४५० सदनिकांचा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

प्रचंड किमतींमुळे म्हाडाच्या सदनिकांना दीड-दोन वर्षांत प्रतिसाद लाभला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन फेब्रुवारी २०१९ मध्ये म्हाडाने सदनिकांच्या किमतीत १४ ते ४७ टक्क्य़ांपर्यंत कपात करत सामान्यांना आकृष्ट करण्याचे नियोजन केले.

नाशिक शहरासह धुळे, श्रीरामपूर येथील किंमत कमी केलेल्या ११३३ सदनिकांची सोडत एप्रिल महिन्यात काढण्यात आली होती. यामध्ये श्रीरामपूर, धुळे प्रकल्पातील १७५ सदनिका होत्या. उर्वरित ९५८ सदनिका नाशिकमधील आहेत. आडगाव-म्हसरूळ रस्ता, पंचक शिवार, पाथर्डी, मखमलाबाद, म्हसरूळ शिवारातील हे प्रकल्प आहेत. किंमत कमी केलेल्या सदनिकांची संगणकीय सोडत काढली गेली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास २६०० ग्राहकांनी म्हाडाच्या सदनिका खरेदीसाठी अर्ज भरले होते. सोडतीत ज्यांची नावे आली, त्यातील निम्म्या ग्राहकांना सदनिका खरेदी करता आल्या. एकूण सदनिकांपैकी ५० टक्के म्हणजे सुमारे ५०० सदनिकांची विक्री झाली. उर्वरित निम्म्या सदनिका अद्याप विकल्या गेलेल्या नाहीत. या सदनिकांसाठी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना खरेदीसाठी निमंत्रित केले जात आहे.

सोडतीवेळी उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली होती. अर्जदारास एकापेक्षा जास्त योजनेत अर्ज करण्याची मुभा होती. सोडतीत एकापेक्षा जास्त सदनिकेसाठी अर्जदार यशस्वी झाल्यास त्याला एकच सदनिका दिली जाईल, असे म्हाडाने आधीच स्पष्ट केले होते. यामुळे सोडतीत नाव आल्यानंतर संबंधितांना उर्वरित अर्जाचा विचार सोडावा लागला. काहींकडे उत्पन्नाचे अपेक्षित पुरावे नसल्याने त्यांना वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळाले नाही. यामुळे त्यांना सदनिका खरेदी करता आली नाही. म्हाडाने किमती कमी करूनही सात महिन्यांत ४०० ते ५०० सदनिकांची विक्री झाली नसल्याचे वास्तव आहे. आर्थिक मंदीचा प्रभाव सर्वच क्षेत्रावर जाणवत आहे. म्हाडाची घरे त्यापासून अलिप्त राहू शकली नसल्याचे दिसून येते.

एप्रिल महिन्यात काढलेल्या सोडतीतील ११३३ पैकी निम्म्या सदनिकांची विक्री आतापर्यंत झाली आहे. शिल्लक सदनिकांसाठी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी दिली जात आहे. आधीच्या प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीबरोबर म्हाडाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कामटवाडे शिवारात १७८ आणि मखमलाबाद शिवारात ४२ सदनिकांच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. आडगाव येथील ४५० सदनिकांचा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. – आर. रे. मिसाळ  (मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा)