मुक्त विद्यापीठाच्या चर्चासत्रात कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांची खंत
शिक्षणविषयक जे. पी. नाईक यांच्या शिफारसी सुमारे ३० वषार्ंनंतरही अंमलबजावणीत येऊ शकल्या नाहीत. त्यामुळेच आज शैक्षणिक बदलांच्या धोरणांची गरज आहे. नव्याने येणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी आणि त्यांचे फलित यांचाही विचार करण्याची वेळ आली आहे. धरसोड वृत्तीमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खंत व्यक्त केली.
विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय शिक्षणशास्त्र निष्णात माजी विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘मुक्त शिक्षण प्रणालीतील एम. एड. शिक्षणक्रमातून झालेला व्यावसायिक विकास’ या विषयावरील चर्चासत्रात प्रा. साळुंखे यांनी भारतात ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया का घटली याचा शोध घेण्याची गरज आहे. ज्या देशात ज्ञाननिर्मिती थांबते, तो देश प्रगतीच्या आलेखात घसरतो असे मत मांडले. पाश्चात्त्य देशात दूरस्थ शिक्षणासंदर्भात उत्तम साहित्यनिर्मिती होत आहे. त्या दर्जाची संदर्भ साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. समाजात व्यक्तिगत पातळीवर दखलपात्र काम होते. परंतु, समूहात आपण कमी पडतो. समाजातील प्रश्नांचा अभ्यास करून त्याच्या निराकरणासाठी शिक्षणात सामाजिक शास्त्राचा समावेश करण्याची गरज आहे. सामाजिक शास्त्राचा अभ्यास केल्यास निश्चितच प्रश्न सुटू शकतील. नव्याने येणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी आणि त्यांचे फलित यांचाही विचार करणे आवश्यक आहे. विद्यापीठाचे संशोधन हे धोरणात्मक प्रक्रियेला गतिमान करू शकेल अशा गुणवत्तेचे असावे, अशी अपेक्षाही प्रा. साळुंखे यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे माजी संचालक अनंत जोशी, संचालक डॉ. संजीवनी महाले, प्रा. रवी जाधव, डॉ. विजया पाटील उपस्थित होते. आभार शर्मिता ओक यांनी मानले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 12:10 am