News Flash

समृद्धीबाधित गावांमध्ये काळी दिवाळी

प्रशासनाने मोजणीचा प्रयत्न केल्यास शेतात आत्महत्या करण्याचा इशारा याआधी शेतकऱ्यांनी दिला होता.

सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी लावलेला आकाशकंदील. 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. शिवडे गावात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भव्य काळा आकाशकंदील उभारून समृद्धी महामार्गाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मार्गासाठी जमीन दिली जाणार नसल्याचा पुनरुच्चार संबंधितांनी केला. प्रस्तावित महामार्गात जिल्ह्यातील एकूण ४८ गावे बाधित होतात. त्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवाळीचे औचित्य साधून समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मार्ग अनुसरला गेला.

समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी थेट खरेदी करण्यासाठी रेडिरेकनरच्या पाच पट दर जाहीर करूनही दोन महिन्यांत शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत १०० हेक्टरहून अधिक जमिनीची खरेदी झाली असून ४०० शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास संमती दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. काही गावांतून या महामार्गास कडाडून विरोध केला जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे शिवडे. या गावात आजतागायत मोजणीची प्रक्रियादेखील झालेली नाही. प्रशासनाने मोजणीचा प्रयत्न केल्यास शेतात आत्महत्या करण्याचा इशारा याआधी शेतकऱ्यांनी दिला होता. त्यासाठी शेतांमध्ये झाडांना लावलेले फास आजही तसेच आहेत. अलीकडेच झालेल्या समृद्धीबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत काळी दीपावली साजरी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही तालुक्यांत २० ते २५ गावांमध्ये बाधित शेतकऱ्यांनी घरावर काळे आकाशकंदील लावल्याची माहिती समितीचे पदाधिकारी राजू देसले व शिवडे येथील शेतकरी संदीप हरक यांनी दिली. शिवडे गावात सकाळी बाधित शेतकरी मध्यवर्ती भागात एकत्र झाले. गावात काळ्या रंगातील भव्य आकाशकंदील लावण्यात आला. त्याद्वारे काळी दिवाळी साजरी करीत असल्याचे सूचित करण्यात आले. समृद्धी महामार्ग व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कोणत्याही स्थितीत शेतजमीन दिली जाणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सूचित केले. समृद्धी महामार्गातून बागायती व पिकाऊ क्षेत्र वगळण्याची गरज आहे. जिल्ह्य़ात बहुतांश शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शवूनही प्रशासनाने खरेदीचे दर जाहीर केले असा आक्षेप नोंदविण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 1:23 am

Web Title: oppose to nagpur mumbai samruddhi corridor black diwali
Next Stories
1 ..तरीही कर्जाचे दुष्टचक्र
2 प्रवाशांसह चालक-वाहकांचेही हाल
3 ‘एचएएल’कडे पुढील तीन दशकांपर्यंत काम
Just Now!
X