नाशिक : भीमा-कोरेगाव प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यास राज्य सरकारकडून होणारा विरोध आक्षेपार्ह असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नाशिक विभागीय आढावा बैठकीकडे भाजपच्या बहुतांश आमदारांनी पाठ फिरवली. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर आपले प्रश्न मांडण्यासाठी भूमिका मांडण्याला पक्षीय फुटपट्टी लावणे योग्य नसल्याचे विखे म्हणाले.

भीमा-कोरेगाव प्रकरणात महाराष्ट्र पोलीस सहकार्य करत नसल्याच्या प्रश्नावर विखे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. पूर्वी ज्यांनी पोलिसांच्या पक्षपातीपणावरून आरोप केले, तेच आता सत्तेत आहेत. यामुळे आता त्यांचे सरकार काही लपवू पाहते काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेले विधान निषेधार्ह आहे. काँग्रेसने लगेच सत्तेबाहेर पडायला हवे होते, परंतु काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार झाल्याचा टोला त्यांनी लगावला.