विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची भाजपविरोधात घोषणाबाजी

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा धरण समूहात समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे पाणीकपात रद्द करण्याच्या मागणीवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. या संबंधीचे पत्र वाचन न केल्यावरून राष्ट्रवादीचे गटनेते गजानन

शेलार आणि अपक्ष गटाचे ज्येष्ठ नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी निषेध करत सभात्याग केला. सभागृहाबाहेर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली.

मंगळवारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यात पाणी कपातीचा विषय वादाचा मुद्दा ठरला. रविवारच्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणात समाधानकारक जलसाठा झाला आहे. तरीदेखील गंगापूरमधील जलसाठा ९० टक्क्यांवर जाईपर्यंत कपात मागे घेतली जाणार नसल्याचे पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आधीच नमूद केले आहे. महापौर रंजना भानसी यांनीही तसेच संकेत दिले आहेत. शहरात सध्या ज्या भागात दोन वेळा पाणीपुरवठा होतो, तिथे एकदाच आणि ज्या भागात एक वेळ पाणीपुरवठा होतो, तिथे काही अंशी कपात लागू आहे. या व्यतिरिक्त सप्ताहातील गुरुवार हा कोरडा दिवस पाळला जातो. या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून बचतीचे धोरण अवलंबिले गेले आहे. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे गुरुवारचा पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशा मागणीचे पत्र बग्गा, शेलार यांनी महापौरांना दिले होते.  त्याचे सभागृहात वाचन करण्याचा आग्रह त्यांनी धरला. स्थायी सदस्य, महिला-बाल कल्याण समिती आणि विशेष समिती सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर पत्राचे वाचन केले जाईल, असे महापौरांनी सांगितले. यावरून उभयतांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

अभिनंदनाचे प्रस्ताव वाचले जातात, परंतु नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे पत्र वाचले जात नसल्याचा आक्षेप शेलार यांनी नोंदविला. अखेर त्यांच्यासह बग्गा हे निषेध करत सभागृहातून बाहेर पडले. पालिकेच्या आवारात विरोधी नगरसेवकांनी भाजपच्या दादागिरी विरोधात घोषणाबाजी केली. गंगापूर, दारणा धरणात पाणी पातळी उंचावली असली तरी काही दिवसांपूर्वी लागू केलेली कपात पुढील काही दिवस कायम ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. भाजपने त्यास अप्रत्यक्षपणे सहमती दर्शविली आहे. या घटनाक्रमातून पाण्याचे राजकारण नव्याने सुरू झाल्याचे दिसून येत आहे.