News Flash

रेमडेसिविरचा पुरवठा न करणाऱ्या वितरकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आरोग्य, वैद्यकीय विभागासाठी जे काही तातडीने लागते, ते खरेदीचे अधिकार आयुक्तांना  देण्यात आले.

मायलेन कंपनीला महापालिका नोटीस पाठवणार

नाशिक : करोना काळात महापालिका रुग्णालयांसाठी सहा हजार इंजेक्शनची मागणी नोंदवूनही त्याचा पुरवठा न केल्या प्रकरणी गेट वेल फार्मा या औषध वितरकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश स्थायी सभापती गणेश गिते यांनी दिले. सोमवारी महापालिका स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत रेमडेसिविरच्या विषयावरून बराच गदारोळ उडाला. वितरकाने महापालिकेला इंजेक्शन न देता ती खुल्या बाजारात विकली. कंपनीला आगाऊ रक्कम देऊन खरेदी केलेली इंजेक्शनही रुग्णांना मिळत नाही. त्यांचा काळा बाजार झाल्याचा आरोप करीत सदस्यांनी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. ७० लाख रुपये आगाऊ देऊनही २० दिवस उलटूनही इंजेक्शनचा पुरवठा न केल्याबद्दल मायलेन कंपनीला नोटीस बजावली जाणार आहे.

गेल्या शनिवारी भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे याने मोटारीने बिटको रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काच तोडून रुग्णालयात गोंधळ घातला होता. नंतर नगरसेविका सीमा ताजणे यांनी बिटको रुग्णालयात रुग्णांना रेमडेसिविरसह आवश्यक ती औषधे मिळत नसल्याचा आक्षेप नोंदविला होता. स्थायी समितीच्या सभेत या घटनाक्रमांचे प्रतिबिंब उमटले. तोडफोडीचे कुणी समर्थन केले नाही. परंतु, ही वेळ का आली, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

आरोग्य, वैद्यकीय विभागासाठी जे काही तातडीने लागते, ते खरेदीचे अधिकार आयुक्तांना  देण्यात आले. स्थायीत यासंबंधीचे प्रस्ताव मंजूर केले जातात. असे असताना पालिका रुग्णालयात विदारक स्थिती आहे. बिटकोत ग्रामीण भागातील रुग्णांकडून २० हजार घेऊन प्राणवायूसज्ज खाट देण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोप राहूल दिवे यांनी केला. या रुग्णालयात चार दिवसांत १३२६ इंजेक्शन संपुष्टात आल्याकडे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी लक्ष वेधले. नवीन साठा येईपर्यंत उपलब्ध साठ्याचे नियोजन करणे आवश्यक होते. यात वैद्यकीय विभाग, रुग्णालय व्यवस्थापन अपयशी ठरले. परिणामी, १० दिवसांपासून बिटकोत रेमडेसिविर उपलब्ध नाही. ३० मार्च आणि एक एप्रिल २०२१ रोजी गेट वेल फार्माकडे इंजेक्शनची मागणी नोंदविली होती. परंतु, महापालिकेला ते मिळाले नाहीत. खुल्या बाजारात इंजेक्शन विकले गेले. वेळेवर इंजेक्शनचा पुरवठा न केल्याप्रकरणी संबधित पुरवठादारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बडगुजर यांनी केली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी वर्षभरात रेमडेसिविरच्या झालेल्या खरेदीची माहिती मांडून सहा हजार इंजेक्शनचा पुरवठा न केल्यामुळे वितरकास नोटीस बजावण्यात आल्याचे नमूद केले. मध्यंतरी रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा गेट वेल फार्माने इंजेक्शन देता येणार नसल्याचे मेलद्वारे कळवून थेट कंपनीकडून खरेदी करण्यास सुचवले होते. महापालिकेने मायलेन कंपनीशी संपर्क साधून २० हजार इंजेक्शनची मागणी नोंदविली. त्यानुसार काही इंजेक्शन प्राप्त झाले. यासाठीची रक्कम आगाऊ दिली जाते. पाच हजार इंजेक्शनसाठी ७० लाखाची रक्कम देण्यात आली. अद्याप ते प्राप्त झाले नसल्याचे नागरगोजे यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:58 am

Web Title: order case against the distributor not supply remedicivir injection akp 94
Next Stories
1 महापालिकेकडून चिनी बनावटीच्या प्राणवायू कॉन्संटे्रटरची खरेदी
2 आठशे रुपयांच्या उधारीसाठी अपहरण
3 रुग्णांच्या मागणीपेक्षा कमी इंजेक्शन मिळण्याची शक्यता
Just Now!
X