परीक्षार्थी संभ्रमात; अंमलबजावणीबाबत प्रशासनामध्ये गोंधळाचे वातावरण

आधीपासून रडतखडत चाललेली नाशिकची तलाठी भरती प्रक्रिया दोन शासकीय विभागांच्या परस्परविरोधी अध्यादेशांमुळे अंतिम टप्प्यात रखडल्यामुळे शेकडो परीक्षार्थी संभ्रमात सापडले आहेत. नेमक्या कोणत्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या कैचीत सापडलेल्या जिल्हा निवड समितीने त्याबाबत शासनाकडे दाद मागितली आहे. उपरोक्त सूचना आल्यावर ही प्रक्रिया पुढे नेली जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि, सुरुवातीपासून ग्रहण लागलेल्या भरती प्रक्रियेबद्दल भलतीच माहिती दिली जात असल्याने परीक्षार्थी त्रस्तावले आहेत.

मागील वर्षी शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली खरी, परंतु, नाशिकच्या लेखी परीक्षेचे गुण जाहीर करूनही ती अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. जिल्हा निवड समितीच्या अखत्यारीत राबविलेल्या या प्रक्रियेत एकूण ४५ जागांसाठी तब्बल १७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.

जिल्ह्यात १९ जुलै २०१५ रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना ऐनवेळी रमजान ईद व ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे परीक्षा पुढे ढकलली गेली. त्यानंतर पुन्हा सप्टेबरमधील तारीख निश्चित केली गेली. परंतु, परीक्षेला दोन दिवस बाकी असताना कुंभमेळ्यातील शाही पर्वणीचे कारण देऊन पुढे ढकलली गेली. अखेर परीक्षेला ४ ऑक्टोबर २०१५ चा मुहूर्त सापडला. या दिवशी परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परीक्षेचे गुण जाहीर करण्यात आले.

त्यानंतर निवड समितीने २६ ऑक्टोबर रोजी सुधारित गुण संकेतस्थळावरून जाहीर केले. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आजतागायत निवड समितीने कोणतीही माहिती दिली नाही. परीक्षार्थीनी विचारणा केली असता वेगवेगळी कारणे दिली जात असल्याची परीक्षार्थीची तक्रार आहे. कोणाला भरती प्रक्रियेतील जागा वाढण्याची शक्यता असल्याचे तर कोणाला पेसा कायद्यातील अध्यादेशामुळे विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.

आधीच विलंबाने झालेल्या आणि निकाल जाहीर होऊनही रखडलेल्या भरतीत निवड समितीच्या या उत्तरांमुळे परीक्षार्थीचा जीव टांगणीला लागला आहे. वास्तविक कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसात लावणे बंधनकारक आहे. नाशिकच्या परीक्षेला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही निवड समिती ढिम्म असल्याची तक्रार परीक्षार्थी करत आहेत.

नाशिकप्रमाणे नगर जिल्ह्यातील भरती प्रक्रियाही रखडल्याची तक्रार परीक्षार्थ्यांकडून केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तलाठी भरती प्रक्रिया थांबविलेली नाही. या संदर्भात शासनाच्या दोन वेगवेगळे आहेत. कोणत्या अध्यादेशानुसार ही प्रक्रिया पार पाडावी, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. पेसा कायद्याशी निगडीत तो विषय आहे. लवकरच शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होईल आणि ही प्रक्रिया त्यानुसार पूर्णत्वास नेली जाईल.

रामदास खेडकर (निवासी जिल्हाधिकारी)