नाशिक : करोना काळात येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अंदाजपत्रक वाढत चालल्याने संयोजकांनी सर्व पातळीवरून निधी जमविण्याची धडपड चालविली आहे. संमेलनानिमित्त प्रकाशित केल्या जाणाऱ्या आकर्षक स्मरणिकेच्या जाहिरातीतून जवळपास अर्धा ते पाऊण कोटींचा निधी जमविण्याची तयारी करण्यात आली आहे. संमेलनानिमित्त सुमारे तीन हजार स्मरणिकांची छपाई केली जाणार आहे. त्यातील जाहिरातीच्या दरपें ८४ त्रकावर नजर टाकल्यास यातून मोठा निधी जमविण्याचा संयोजकांचा मानस आहे.

लोकहितवादी मंडळाच्यावतीने २६ ते २८ मार्च या कालावधीत मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. करोनाच्या नियमांचे पालन करून संमेलन आयोजित करावयाचे असल्याने दैनंदिन स्वच्छता, सुरक्षित अंतराचे पथ्य आणि आरोग्य या विषयावर विशेषत्वाने भर द्यावा लागणार आहे. यामुळे संमेलनाच्या खर्चात वाढ होणार असताना संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पर्यायाने त्यांची निवास, भोजन आणि वाहतुकीची जबाबदारी संयोजकांना पेलावी लागणार आहे. मुख्य सभामंडपाची जागा बदलल्याने आता विस्तीर्ण मैदानावर आकाराने मोठा सभामंडप उभारावा लागणार आहे.

अशा अनेक कारणांमुळे संमेलनाच्या प्रारंभी गृहीत धरलेल्या साडेतीन कोटीच्या अंदाजपत्रकात मोठी वाढ होणार असल्याकडे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लक्ष वेधले होते.

उद्योजक, सहकारी बँका, शिक्षण संस्था, हॉटेल, मंगल कार्यालय आदी घटकांना संमेलनासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध पातळीवरून निधी संकलनाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये संमेलनानिमित्त प्रकाशित केल्या जाणाऱ्या स्मरणिकेच्या जाहिरातीतून भरीव निधी जमविण्याचा प्रयत्न आहे. स्मरणिका निर्मितीसाठी १४ जणांचा समावेश असलेली संपादकीय-जाहिरात समिती स्थापन करण्यात आली आहे.

लोकहितवादी मंडळाने संमेलनाच्या प्रकाशित केलेल्या माहिती पत्रिके त  स्मरणिकेच्या जाहिरातीचे दर देण्यात आले आहेत. त्यानुसार मलपृष्ठावरील जाहिरातीसाठी १५ लाख रुपये, स्मरणिका आतील चार पानांसाठी प्रत्येकी १० लाख (एकूण ४० लाख), पूर्ण पान रंगीत तीन लाख, अर्ध पान रंगीत दीड लाख, पाव पान रंगीत ७५ हजार, साधी जाहिरात पूर्ण पान एक लाख रुपये, अर्ध पान ५० हजार, पाव पान २५ हजार, केवळ शुभेच्छा पट्टीसाठी १० हजार रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. या सर्वाची गोळाबेरीज केल्यास साधारणत: किमान ६० ते ७५ लाखापर्यंत जमविण्याचा प्रयत्न आहे. रंगीत वा साधी जाहिरात, शुभेच्छा पट्टी यासाठी पानांची मर्यादा नाही. जशा त्या मिळतील, तशी स्मरणिकेची पाने वाढविली जातील.

पुस्तक, ग्रंथ प्रकाशनासाठी विनामूल्य व्यवस्था

मराठी साहित्य संमेलनात आपल्या पुस्तकाचे, ग्रंथांचे प्रकाशन साहित्यिकाच्या हस्ते व्हावे, अशी अनेक लेखकांची  इच्छा असणे स्वाभाविक आहे.  गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन नगरीत स्वतंत्र अशी साहित्य प्रकाशनार्थ व्यवस्था केली जाते. त्यानुसार कुसुमाग्रज नगरीमध्येही स्वतंत्र साहित्य प्रकाशन कट्टय़ाची अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी आकर्षक असे व्यासपीठ असणार आहे. प्रकाशन सोहळ्याच्या दृष्टिकोनातून तेथे आवश्यक ती ध्वनी, प्रकाश व्यवस्था, व्यासपीठ असणार आहे. शिवाय रसिक वाचकांच्या दृष्टीने खुच्र्यांची सुयोग्य बैठक व्यवस्थाही असणार आहे. अशा ठिकाणी लेखकाला आपल्या पुस्तकाचे, ग्रंथाचे प्रकाशन करण्याची सर्व व्यवस्था असणार आहे. प्रकाशन करणाऱ्या व्यक्तीकडुन अथवा संस्थेकडून एक हजार रुपये घेण्याची सूचना करण्यात आली होती. तथापि एकूणच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि साहित्याचाही अधिकाधिक प्रसार व्हावा यादृष्टीने कोणतेही मूल्य न आकारता ही व्यवस्था प्रकाशन कट्टय़ाच्या माध्यमातून होणार आहे. याचा नवोदित लेखक, साहित्यिक, प्रकाशन संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर आदींनी केले आहे.