भात, उडीदचे जास्त नुकसान, शेतकरी चिंतातुर

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल आणि जवळीलच पेठ तालुक्यातील बहुतेक गावातील भात, उडीद या पिकांवर मोठया प्रमाणावर तांबेरा, टाके हा रोग पडला असून उडिदावर मोठे किडे, अळी दिसून येत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

यंदा पाऊस उशिरा पडला. अधूनमधून उघड-झाप करणाऱ्या पावसाचा परिणाम पिकांवर झाला आहे. केवळ खरीप पिकावर येथील शेतकरी अवलंबून असल्याने या वर्षी आपल्या हातात काही लागणार नाही हे शेतकऱ्यांनी गृहीत धरले आहे. अनेकांनी आतापासूनच स्थलांतर करण्यास सुरुवात  केली आहे. दोन वर्षांपासून निसर्गातील बदलामुळे येथील शेतकरी आता हळूहळू आपली पारंपरिक शेती कमी करू लागला असून पाच, दहा वर्षांपूर्वी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे पीक आता दुर्मीळ झाले आहे.

अलीकडच्या काळात नागली पिकावर सतत किडीचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव आणि आदिवासी समाजातील कमी होणारी गाई, गुरे, सध्या वापरात येणारी रासायनिक खते यामुळे नागलीसारख्या पिकाला आतापासून धोका निर्माण झाला आहे. फार थोडय़ा क्षेत्रात या पिकाची लागवड झाली आहे. त्यावरही रोग दिसून येत आहे. मुळातच कोरडवाहू शेतीसाठी अगदी भाजणी, नांगरणी, राब कोळपणीसह अन्य मशागतीमुळे आपले पोट भरण्यापुरते का होईना पीक हाती लागत नसल्याने आता मजुरीचा पर्याय शेतकरी निवडू लागले आहेत. यामुळे पुढील काळ हा चिंताजनक आहे.

इतर गावातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभाग यांच्याकडे कीड नियंत्रण औषधांची मागणी केली आहे. पळशी येथील माजी सरपंच वामन कुंभार, दौलत खोटरे, कृष्णा खोकरे, प्रकाश कुंभार, काशिनाथ वाघले, शंकर कुंभार आदींनी ही मागणी केली आहे. याविषयी रमेश ठाकरे यांनी वास्तव मांडले. हरसूल आणि पेठ तालुक्यातील परिसर हा डोंगर-उताराचा असून नागली, भात, वरई आणि डाळीसाठी उडीद हे मुख्य पीक आहे. परंतु, अलीकडच्या काळात सतत रोगराई येता आहे. परिसरात काही दिवसांपूर्वी माळरानावर ५० ते शंभर पोते नागली पिकविणाऱ्या शेतकऱ्याला आज नागलीची भाकर मिळत नाही, उलट मोलमजुरी करून बाजरी, गहू विकत आणून खावे लागतात. उडीद शेतकरी स्वत:साठी ठेऊन बाकी विकतात. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांनाच उडीद शंभर रुपये किलो दराने विकत घेऊन खावे लागत आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.