कुणी खुर्चीच्या आधारे बसलेले… प्राणवायूची लहान टाकी बाजूला ठेवत सर्वांच्या हालचाली हतबलपणे पाहणाऱ्या नजरा… रुग्णालयातील गर्दीत आपलं कोणी दिसतं का याची उत्सुकता… माझे आई, बाबा कुठे आहेत, असा टाहो फोडणारे सैरभैर झालेले नातेवाईक… या साऱ्यांना आधार द्यायचा की ही परिस्थिती हाताळायची अशा विवंचनेत अडकलेले रुग्णालयाचे कर्मचारी. या साऱ्यांवर नजर ठेवत त्यांना खाकी वर्दीने दिलेली संरक्षणाची भिंत. रुग्ण, मयत रुग्णांचे नातेवाईक, पोलीस सर्वांची भावना एकच होती. ती म्हणजे असा मृत्यू वैऱ्यावरही येऊ नये.

बुधवारी येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायू भरलेल्या टाकीतून गळती झाल्यानंतर २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्वच हादरले. मृत्यूचे तांडव नजरेने अनुभवण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांच्या आप्तांवर आली. शहर परिसरातील मध्यवर्ती भागापासून दूर असलेल्या डॉ. हुसेन रुग्णालयात अल्पसंख्याकांचा राबता अधिक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच मध्यवर्गीय लोकांना या रुग्णालयाचा आधार वाटतो. करोनाकाळात या रुग्णालयाने रुग्णांसाठी संजीवनीचे काम केले. परंतु बुधवारचा दिवस रुग्णालय तसेच रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी काळा दिवस ठरला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काही रुग्ण हे दोन ते तीन दिवसांत घरी परतणार होते. काही अत्यवस्थ असल्याने अखेरच्या घटका मोजत होते.

सकाळी नऊ वाजेपासून रुग्णालयात गंभीर रुग्णांना प्राणवायूची कमतरता जाणवत होती. प्राणवायूचे प्रमाण एकदमच कमी होताच अतिदक्षता कक्षातील  एकापाठोपाठ एक रुग्णांचे तडफडणे सुरू झाले. ही स्थिती पाहून अधिकारी, कर्मचारी हबकले. परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या रुग्णाचा मृत्यू झाला, त्याचे प्राणवायूचे सिलिंडर तातडीने दुसऱ्या रुग्णाला लावणे सुरू झाले. त्याची छाती चोळणे, त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी प्रत्येक जण धडपडू लागला. रुग्णांसाठी जेवणाचा डबा घेऊन आलेले काही जण त्यांच्या देखभालीत मग्न  असताना सुरू झालेला मृत्यूचा खेळ पाहून हबकले. रुग्णालयात अपघात झाल्याचे समजताच ज्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित नव्हते, तेही रुग्णालयाकडे धावले. काहींनी बाहेरून प्राणवायूच्या लहान टाक्या आणल्या. काहींनी तातडीने आपल्या नातेवाईकाला तेथून हलवले. मात्र आपली जवळची माणसे गमावल्याने अनेकांच्या भावनांचा उद्रेक झाला. पोलिसांनी वेळीच धाव घेत रुग्णालयात बाहेरील लोकांना प्रवेश बंद करत रुग्णालयाला खाकीचे संरक्षण दिले.

लवकरच घरी जाणार होते, पण…

विकी जाधव याच्या आजी सुगंधा थोरात यांना सकाळपासून प्राणवायू कमी पडत होता. त्याविषयी डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक अपघात घडला. आजीचा मृत्यू डोळ्यासमोर झाला. डॉक्टरांनी तातडीने तिच्या सिलिंडरचा वापर दुसऱ्या रुग्णासाठी सुरू केला. माझ्यासमोर १२ लोकांनी तडफडत प्राण सोडला, असे हमसून हमसून विकी सांगत होता. शेलार यांची आई लीना यांना दोन ते तीन दिवसांत घरी सोडणार होते, पण तिला प्राणवायू मिळाला नाही. रुग्णालय व्यवस्थापनाच्या गैरप्रकारामुळे आईचा जीव गेला, असे त्यांचे म्हणणे आहे. वालुकर यांची आई आणि भाऊ उपचार घेत होते. भावाला चार दिवसांनी तर आईला उद्या सोडणार होते. आईने नाश्ता केला. भावाने जेवणास सुरुवात करताच हा प्रकार घडला. माझ्यासमोर भाऊ तडफडत गेल्याचे त्यांनी सांगितले.