स्थायी समिती सभापतींचे आदेश,  करोनाच्या संकटातील प्रशासकीय करामत

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात मनपाच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूच्या टाक्या विकत घेण्याऐवजी भाडेतत्त्वावर घेण्याचा आतबट्टय़ाचा व्यवहार करण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन प्राणवायूचा तुटवडा नसताना १० वर्षांसाठी टाक्यांना लाखो रुपये भाडे मोजण्यावर स्थायी समितीने आक्षेप घेतला आहे. भाडेतत्वावर टाक्या घेण्याचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी पुढील बैठकीत प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्थायी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली गरुवारी समितीची बैठक पार पडली. यावेळी भाडेतत्वावर प्राणवायूच्या टाक्यांसह मनपा रुग्णालयात डॉक्टर-तंत्रज्ञांचा भेडसावणारा तुटवडा, प्रतिजन चाचण्या बंद झाल्यामुळे नागरिकांवर पडणारा भरूदड आदी वैद्यकीय विभागाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. महापालिकेने प्रतिजन चाचण्या बंद केल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीसाठी नागरिकांना डॉ. झाकीर हुसेन अथवा समाज कल्याण विभागाच्या करोना काळजी केंद्रात पाठविले जाते. डॉक्टरांनी सूचित केले असेल तरच तपासणी केली जाते. तिथे तपासणी न झाल्यास कुटुंबाला खासगी प्रयोगशाळेतून तपासणी करावी लागत असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधून प्रतिजन चाचण्या सुरू करण्याची मागणी केली.

राज्यात प्राणवायूची टंचाई असल्याने महापालिकेने प्राणवायूच्या टाक्या खरेदी करण्याचे ठरविले होते. करोनाच्या आपत्तीत आर्धिक अधिकार प्रशासनाला देण्यात आले होते. तेव्हा टाक्या विकत घेण्याऐवजी १० वर्षांसाठी भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात या टाक्या बसवून ठेकेदाराला भाडे देण्याचे निश्चित झाले.  त्यानुसार निविदा मंजूर झाली. सद्यस्थितीत करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होऊन प्राणवायूची फारशी गरज लागत नाही. दुसरीकडे महापालिकेने मविप्र रुग्णालयास मदतरुपी दिलेल्या दोन प्राणवायूच्या टाक्या वापराविना पडून असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. चर्चेअंती प्राणवायूच्या टाक्यांच्या भाडय़ाचा प्रस्ताव रद्द करण्याचे निर्देश स्थायी सभापतींनी दिले. दरम्यान, इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या ७७ शाळांमधील इमारतींची स्वच्छता, देखभाल दुरुस्तीची तपासणी करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

बंधपत्रातील डॉक्टरांना मनपा रुग्णालयात सेवेसाठी प्रस्ताव

फिजिशियन आणि एमबीबीएस डॉक्टरांनी महापालिकेच्या सेवेकडे पाठ फिरवल्याने बंधपत्रानुसार शासकीय सेवा कराव्या लागणाऱ्या डॉक्टरांना महापालिकेच्या रुग्णालयात सेवेची सक्ती करावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. स्थायीच्या बैठकीत बिटको रुग्णालयातील मनुष्यबळाअभावी भेडसावणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. अनेक वर्षांपासून महापालिकेच्या सेवेत येण्यास फिजिशियन आणि एमबीबीएस डॉक्टर तयार नसल्याचे वारंवार सिध्द झाले आहे. मध्यंतरी महापालिकेने एमबीबीएसच्या २३ डॉक्टरांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविली होती. परंतु, केवळ सात अर्ज आले. त्यातील एक जण रुजू होण्यास तयार झाला. परंतु, नंतर तोही माघारी फिरल्याकडे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी लक्ष वेधले. केवळ डॉक्टरच नव्हे तर, सोनोग्राफी, ‘एमआरआय’साठी तंत्रज्ञ मिळत नसल्याने वारंवार जाहिरात देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. यावर सभापती गणेश गिते यांनी कंत्राटी पध्दतीने डॉक्टर भरतीच्या प्रक्रियेत वेतन आणि कराराच्या कालावधीत बदल करण्याची सूचना केली. तीन महिने करार करण्याऐवजी हा कालावधी ११ महिन्यांचा करण्यास सांगण्यात आले आहे. डॉक्टरांचा तुटवडा कमी करण्यासाठी बंध पत्रानुसार सक्तीने शासकीय सेवा कराव्या लागणाऱ्या डॉक्टरांची महापालिकेत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केली जाणार आहे.