ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी जीवन आणि सकल संत वाङ्मयातील विचारांचा प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांना संताचे चरित्र समजावे, या हेतूने नाशिक येथील श्री संत सेवा संघ आणि पुण्याचे खडके फाऊंडेशन यांच्या वतीने ‘संतांच्या जीवनातील प्रसंग’ या विषयावर आधारित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सिन्नर येथील सारडा विद्यालयाने उत्कृष्ट यश मिळविले.
स्पर्धेत जिल्ह्य़ातील ९० शाळांच्या निवडक अशा ७०० विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा समावेश होता. सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार जाधव याने द्वितीय क्रमांकाचे दोन हजार रुपयांचे, तर हरीश देशमुखने तृतीय क्रमांकाचे एक हजाराचे, तसेच प्रतीक कंकरेजने उत्तेजनार्थ ५०० रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले. नाशिक येथील इंदिरानगरमधील श्री संत ज्ञानेश्वर संकुलातील कलादालनात आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश व प्रफुल्ल या सावंत बंधूंसह भि. रा. सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या वेळी शिक्षक राहुल मुळे यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी मंचावर सुहास जोशी, स्वाती राजवाडे, संत सेवा संघाच्या अनघा ढगे आदी उपस्थित होते.