इतिहासाच्या खुणा जपत कलेचा सुंदर आविष्कार अधोरेखित करणारा मात्र जतन न झाल्यामुळे कित्येक वर्षे बिकट अवस्थेत असलेला चांदवडचा होळकरकालीन रंगमहाल कात टाकत आहे. कालौघात महालाच्या समृद्धीच्या खुणा पुसल्या गेल्या असल्या तरी त्याला मूळ स्वरूप देण्याकरिता पुरातत्त्व विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वारसा जतन योजनेंतर्गत उपलब्ध झालेल्या चार कोटीच्या निधीतून रंगमहालाच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास जात असून, लवकरच पर्यटक तसेच इतिहासप्रेमींसाठी हा वारसा खुला होणार आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवडला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या भागात पेशवाई काळात होळकर घराण्याचा सुभा होता. अहिल्याबाईंनी आपल्या कार्यकाळात या ठिकाणी होळकर वाडा उभारला. तत्कालीन चित्रशैलीचा परिचय देणाऱ्या रंगमहालाच्या आजूबाजूला दोन भव्य बुरूज, तटबंदी आणि मध्यभागी उंच दगडी प्रवेशद्वार आहे. लाकडी खांबावरील कोरीव नक्षीकाम, अंबारीसारखे घुमट असलेली तटबंदी, गोलाकार कमानी, बारीक कलाकुसरीची वेलबुट्टी, लाकडाला कोरून तयार केलेली जाळी महालाच्या वैभवात भर घालायची. लाकडी कोरीव काम आजही लक्ष वेधून घेते. दरबारातील रंगीत चित्रांमुळे वाडय़ाला रंगमहाल नाव पडले. पुरातन काळातील कलेचा हा वारसा जतनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर होता. पर्यावरणातील बदल तसेच समाजविघातक प्रवृत्तींमुळे काही वर्षांपूर्वी ऐतिहासिक महाल मोडकळीस आला.
या ठिकाणी टवाळखोरांचा वावर असताना टपाल कार्यालय, वीज वितरण कंपनी यासह काही शासकीय विभागांनी कार्यालये थाटल्याने माणसांचा राबता राहिला. यामुळे रंगमहालाच्या मूळ सौंदर्याला बाधा येऊ लागली. शासकीय कार्यालयांनी आपल्या सोयीप्रमाणे मूळ वाडय़ाचे विभाजन करत काही ठिकाणी खिडक्या, दरवाजे तयार केले. त्यावर पुरातत्त्व विभागाने आक्षेप घेत शासकीय कार्यालयांना बाहेरचा रस्ता दाखविला. दरम्यानच्या काळात महालाच्या जतनासाठी प्रस्ताव सादर केला. केंद्र सरकारने वारसा जतन योजनेंतर्गत दोन टप्प्यात चार कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले काम पाच ते सहा महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे.
पुरातत्त्व विभागाने पहिल्या टप्पात महालाच्या वरील बाजूस अस्ताव्यस्त वाढलेले गवत, तुटलेली कौले काढली. छपरावरील लाकडाचा शिल्लक राहिलेला सांगाडा काढून सागवान लाकडाचा सांगाडा उभारून नव्याने कौले टाकण्यात आली. ज्या भिंती पडल्या होत्या किंवा मोडकळीस आल्या होत्या, त्यांचे काम करत चुन्याचे प्लास्टर देण्यात आले. जी पारंपरिक चित्रे महालाच्या दिवाणखाण्यात होती, त्यांचे जतन व्हावे यासाठी रंगमहालाच्या आवारात ‘कलादालन’सारखी रचना करून ती लावण्यात आली. शासकीय कार्यालयांनी केलेल्या रचना काढून महालातील दोन्ही हौद मोकळे करण्यात आले. काही ठिकाणी दगडी फरशी टाकण्यात आली. लाकडावर धूळ तसेच पर्यावरणीय बदलामुळे झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे आलेली अवकळा दूर करण्यासाठी खास ‘स्क्रॅपिंग’ सुरू केले. खराब झालेले खांब काढून त्या जागी सागवानी लाकडाचे नक्षीदार खांब उभारण्यात आले. दर्शनी भागातील एका दालनात होळकरांची राजगादी ठेवलेली असून त्यासमोरील कारंजाचे सुशोभीकरण केले जात आहे. महालाच्या सभोवताली संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळासह काही तांत्रिक अडचणींमुळे काम संथ गतीने सुरू आहे. मात्र पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे या विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.