26 February 2021

News Flash

महापालिका सभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सभेत नगरसेवकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

करवाढीवरील चर्चा टळली

नाशिक : पुलवामा हल्ल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभादेखील त्यास अपवाद ठरली नाही. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सभेत नगरसेवकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यात सत्ताधारी भाजप, विरोधी शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवक सहभागी झाले. हल्ल्यात ४० जवान शहीद झाले असताना सभेचे कामकाज करणे सयुक्तिक नसल्याचे सांगत अनेकांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. भाजपने सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. सभेपूर्वी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक ध्वजाची होळी करण्यात आली. सर्व प्रकारची करवाढ रद्द करण्याचा ठराव होऊनही प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याने विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चा टळली.

पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

सभेचे कामकाज सुरू होण्याआधीच भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह काही नगरसेवकांनी पाकिस्तानचा निषेध करत सभागृहाबाहेर पाकिस्तानचा प्रतीकात्मक झेंडा जाळला. नंतर सभेचे कामकाज सुरू झाले. प्रारंभी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावांचे वाचन करण्यात आले. महापौरांनी नियमित कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यांना साथ दिली.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाले. देशभरात दु:ख व्यक्त केले जात असताना सर्वसाधारण सभा घेणे योग्य नसल्याचे सांगितले. ही सभा तहकूब करण्याची मागणी त्यांनी केली. मुशीर सय्यद यांच्यासह इतरांनी ही मागणी लावून धरली.

भाजपचे नगरसेवकही पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत सभा तहकुबीची मागणी करू लागले. सर्वाची मागणी लक्षात घेऊन महापौरांनी सभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले. तहकूब झालेली सभा २८ फेब्रुवारी रोजी होईल, तर महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दरम्यान, करवाढीचा विषय गाजत आहे. महासभेत सर्व प्रकारची करवाढ रद्द करण्याचा ठराव झाला होता. त्याची अंमलबजावणी न करता आयुक्तांनी ती कायम ठेवल्याचा विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. या मुद्दय़ावर शिवसेनेसह विरोधी पक्षांनी लक्षवेधी सूचना मांडली आहे. सभागृहात या मुद्दय़ावर वादळी चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सभा तहकूब झाल्याने ही चर्चा टळल्याचे पाहावयास मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:59 am

Web Title: pakistan murdabad slogan in the nashik municipal meeting
Next Stories
1 पाथर्डी शिवारात युवकाचा खून
2 राज्य अपंग बालनाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी
3 प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Just Now!
X