भुसावळ, जळगावमार्गे इतर तीन गाडय़ाही सुरू

मनमाड / भुसावळ : करोना संकट आणि टाळेबंदीमुळे साडे पाच महिन्यापासून बंद असलेली मनमाड —नाशिक—मुंबई ही उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वपूर्ण असलेली पंचवटी एक्सप्रेस १२ सप्टेंबरपासून दररोज धावणार  आहे. रेल्वे मंडळाने संपूर्ण भारतात ८० नवीन प्रवासी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यात महाराष्टातील पंचवटी एक्सप्रेस या एकमेव प्रवासी गाडीचा समावेश करण्यात आला आहे. या गाडीने प्रवासासाठी १० सप्टेंबरपासून आरक्षण सुरू करण्यात येईल. आरक्षण करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मनमाड —कुर्ला गोदावरी, राज्यराणी आणि मनमाड —इगतपुरी शटल या गाडय़ा सुरू होण्याची प्रवाशांना अपेक्षा होती. ती मात्र फोल  ठरली आहे.

पंचवटी एक्सप्रेस ही पूर्णपणे आरक्षित राहणार असून मनमाडहून मुंबईपर्यंत कोणत्याही स्थानकावर जाण्यासाठी आरक्षण करणे आवश्यक आहे. पासधारकांना या गाडीत मज्जाव आहे. दैनंदिन प्रवास करणा?ऱ्या सर्व प्रवाशांना आरक्षण करूनच या गाडीतून प्रवास करावा लागणार आहे. ऐनवेळी रेल्वे तिकीट खिडकीतून त्यासाठी तिकीट किंवा मासिक पास मिळणार नाही. त्यामुळे या गाडीने प्रवास करायचा असल्यास त्याचे आधीच नियोजन करावे लागणार आहे. साडेपाच महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचा रेल्वेने नाशिक, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस  या स्थानकांशी रेल्वेने संपर्क तुटला होता. तो आता सुरू होणार आहे. रेल्वे प्रवासी, चाकरमाने, विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिक यांची त्यामुळे सोय होणार आहे. पंचवटी एक्सप्रेसला पूर्वी जे थांबे होते तेच कायम  राहणार आहेत. मनमाडहून सकाळी सहा वाजता ही गाडी सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला  १०.४५ वाजता पोहचेल. तेथून सायंकाळी सव्वासहा वाजता सुटल्यावर मनमाड येथे रात्री १० वाजून ५० मिनिटांना पोहचणार आहे.

याशिवाय भुसावळ विभागातून शनिवारपासून इतरही तीन गाडय़ा धावणार आहेत. त्यात मनमाड, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर, खंडवा या ठिकाणी थांबणारी बंगळूर-नवी दिल्ली-कर्नाटक ही विशेष गाडी बंगळूरूहून सायंकाळी सव्वासात वाजता सुटेल. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे १०.१५ वाजता नवी दिल्लीला पोहचेल. नवी दिल्लीहून ही गाडी रात्री सव्वानऊ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून ३० मिनिटांना बंगळूरूला पोहचेल. या गाडीला खंडवा, बऱ्हाणपूर, भुसावळ, जळगांव, मनमाड  हे थांबे राहतील. बलसाड-मुजफ्फरपूर श्रमिक विशेष गाडी बलसाडहून रात्री सव्वाआठ वाजता सुटेल. आणि तिसऱ्या दिवशी मुजफ्फरपूरला पोहचेल. ही गाडी जळगांव, भुसावळ, खंडवा येथे थांबेल. मुजफ्फरपूरहून ही गाडी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुटेल. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांना बलसाडला पोहचेल. या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगांव हे थांबे आहेत. याशिवाय अहमदाबाद- पुरी विशेष गाडी  ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून ४० मिनिटांना सुटेल. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे आठ वाजून १० मिनिटांना पुरी येथे पोचेल. या गाडीला

जळगांव, भुसावळ, मलकापूर, अकोला , बडनेरा हे थांबे आहेत. पुरीहून ही गाडी बुधवारी सुटून सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांना सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे साडेसात वाजता अहमदाबादला पोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगांव हे थांबे आहेत. प्रवाशांनी या सुविधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.