मंडळ, महापालिका सामन्यात नागरिकांचाही समावेश; तक्रारींची संधी

गणेशोत्सवात सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता मंडप, व्यासपीठ, कमान उभारणीबाबत महापालिकेच्या काटेकोर नियमावलीबद्दल गणेशोत्सव मंडळांमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना दुसरीकडे मंडप उभारणी, ध्वनिप्रदूषण या संदर्भात नागरिकांना तक्रारी असल्यास त्या सोडविण्यासाठी पालिकेने तक्रार नोंदणी, निवारण यंत्रणादेखील कार्यान्वित केली आहे. काटेकोर नियमावलीने गणेश मंडळ विरुद्ध महापालिका असा थेट सामना रंगू नये म्हणून प्रशासनाने नागरिकांनाही त्यात समाविष्ट केल्याने आता तिरंगी लढत होणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पालिका प्रशासनाने बोलाविलेल्या बैठकीवर सत्ताधारी, विरोधकांसह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. आता महापौर गणेश मंडळांची नव्याने बैठक बोलावणार आहेत. दरम्यानच्या काळात प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी मंडप, व्यासपीठ, कमान उभारण्याबाबतची  लांबलचक स्वरुपातील नियमावली जाहीर केली आहे. त्यातील अटींची पूर्तता करणे कदापि शक्य नसल्याचा सूर गणेश मंडळांमधून उमटत आहे. सुलभ परवानगी प्रक्रियेसाठी महापालिका नेहमीप्रमाणे एक खिडकी योजना संकल्पना राबविणार आहे. मंडळांना विभागीय कार्यालयातील एक खिडकी कक्षात अथवा ऑनलाइन अर्ज करता येईल. रेल्वे स्थानक, बस स्थानक, मुख्य रिक्षा स्थानक, रुग्णालय, शैक्षणिक संस्था आदी गर्दीच्या ठिकाणी मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. यामध्ये रस्ता खोदण्याची परवानगी नाही. तसे शक्य नसल्यास शुल्क भरून वेगळी परवानगी घ्यावी लागेल; अन्यथा नियमानुसार दंड आकारण्याचे सूचित करण्यात आले आहे. गतवर्षीप्रमाणेच तितक्याच अथवा रस्त्याच्या एक चतुर्थाश यापैकी जे कमी असेल त्या आकाराचा मंडप, व्यासपीठ उभारण्यास परवानगी मिळेल.  मंडपाच्या आवारात दोन कमानींना परवानगी दिली जाईल. वाहतुकीस अडथळा होईल, अशी कमान उभारता येणार नाही. लेखी परवानगी मिळाल्यानंतर मंडळांनी मंडप उभारणीचे काम सुरू करावे. परवानगीचे पत्र मंडपाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावे. आग प्रतिबंधक, प्रथमोपचार साधनांची उपलब्धता, कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येकी २०० लिटर पाण्याच्या दोन टाक्या भरून ठेवणे आदी अटी टाकण्यात आल्या आहेत. परवानगी मिळण्यापूर्वी उभारलेले मंडप, कमान हे विनापरवानगी समजले जातील. संबंधितांना नोटीस देऊन ते हटविण्याची कारवाई केली जाईल. तसेच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

मंडप उभारणीआधीच तक्रारींचीही व्यवस्था

नियम पालनाचा आग्रह धरल्याने गणेश मंडळे महापालिकेला लक्ष्य करतील. हे लक्षात घेऊन प्रशासनाने नियमावलीच्या पाठोपाठ महापालिकेने ध्वनिप्रदूषण, रस्त्यावर मंडप उभारणी बाबतच्या तक्रारी करण्यासाठी तक्रार नोंदणी, निवारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या संदर्भातील तक्रारी नागरिक १८००२३३१९८२ या टोल फ्री क्रमांकावर करू शकतात. या शिवाय, विभागनिहाय तक्रार नोंदणीचे क्रमांकही जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेच्या भ्रमणध्वनी अ‍ॅप आणि संकेतस्थळावर नागरिकांना तक्रारी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या ध्वनिप्रदूषण विषयक तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्याकडे, वाहतूक शाखेकडे तर मंडपासंदर्भातील तक्रारी महापालिकेच्या संबंधित विभागीय अधिकाऱ्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. रस्ता, पदपथावर तात्परुत्या स्वरूपात मंडप उभारण्यासंदर्भात दाखल जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.