X

पंकजा मुंडेंकडून ऊसतोड कामगारांची फसवणूक

कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांचा आरोप

कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांचा आरोप

भगवान गडावरील मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण न करता ऊसतोड कामगारांची फसवणूक केली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांना खोटी आश्वासने देत भुलवून स्वतच्या राजकीय फायद्यासाठी वापरले जाते. प्रत्यक्षात मात्र ऊसतोडणी कामगारांना काहीच मिळत नाही, असा आरोप कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी केला.

भगवान गडावर कोणताही राजकीय मेळावा होऊ नये, या नामदेव शास्त्रींच्या भूमिकेला आपला पाठिंबा असून गडावर दसरा मेळावा आयोजित करत राजकीय भाषणबाजी केली जाते. काही त्या जागेचा वापर शक्ती प्रदर्शनासाठी करतात. हे टाळण्यासाठी गडावर मेळावा नको अशी भूमिका त्यांनी मांडली. मागील मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ऊस तोडणी कामगारांसाठी वेतनवाढ व गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळाच्या स्थापनेची घोषणा केली आणि न्याय न मिळाल्यास मंत्री पद सोडण्याची वल्गना केली.

आतापर्यंत तीन वर्षांचे करार होत होते. मात्र मुंडे-पाटील लवादाने फक्त २० टक्के वेतन वाढ देत ५ वर्षांचा करार केला. सात लाख ऊस तोडणी कामगारांचे नुकसान करून साखर कारखानदारांची पाठराखण केली. त्यामुळे भगवान गडासारख्या अध्यात्मिक स्थळाचा राजकारणासाठी उपयोग होता कामा नये. कोणत्याही राजकीय पक्षाला गडावर राजकारण करण्याची संधी देऊ नये अशी मागणी डॉ. कराड यांनी केली आहे.

मजुरांचे २०० कोटींचे नुकसान

प्रत्यक्षात तीन वर्षे होवूनही कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन झाले नाही. मजुरांची नोंदणी झाली नाही. मागील वेतनवाढीच्या वेळी पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी ऊसतोडणी मजुरांची फसवणूक केली. एक वर्षांचा २० टक्के वेतनवाढीचा फरक देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले असतांनाही या दोघांच्याही लवादाने तो बुडविला व मजुरांचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले, याकडे कराड यांनी लक्ष वेधले.

 

Outbrain