१५ हजार वाहनधारक प्रतीक्षेत

नवीन वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी पुस्तक) तिष्ठत असणाऱ्या जिल्ह्यातील हजारो वाहनधारकांना पुढील १५ दिवसात कागदी स्वरुपात हे प्रमाणपत्र उपलब्ध करण्याची तयारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. ‘स्मार्ट कार्ड’ स्वरूपात दिल्या जाणाऱ्या नोंदणी पुस्तकांचा वर्षभरापासून तुटवडा असल्याने हजारो वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकटय़ा नाशिकचा विचार करता तब्बल १५ हजार वाहनधारकांना ही नोंदणी पुस्तिका तीन महिन्यांपासून मिळालेली नाही. दिवसागणिक नवीन वाहनांची संख्या आणि त्या पाठोपाठ प्रलंबित पुस्तिकांचा डोंगर वाढत चालल्याने या विभागाने पारंपरिक अर्थात कागदी स्वरुपात ती उपलब्ध करण्याचा मध्यमार्ग स्वीकारला. हा तुटवडा कमी करण्यासाठी एक लाख वाहन नोंदणी पुस्तकांची छपाई करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट कार्ड स्वरूपात वाहनांचे नोंदणी पुस्तक वाहनधारकांना देण्याची व्यवस्था प्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे. संपूर्ण राज्यात या पध्दतीने खासगी पुरवठादारामार्फत स्मार्ट कार्ड वितरित केली जात होती. नव्या निविदा प्रक्रियेत दरावरून काही वाद झाल्यामुळे हा विषय न्यायप्रविष्ट आहे. यामुळे वर्षभरापासून वाहन नोंदणी पुस्तिकेसाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध होणे बंद झाले. ही बाब नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरली. दुचाकी, चारचाकी खरेदी करणाऱ्या वाहनधारकांना पाच पाच महिने नोंदणी पुस्तक मिळाले नाही. मुख्यालयाकडून स्मार्ट कार्ड वा कागदी स्वरूपात नोंदणी पुस्तिका उपलब्ध होत नसल्याने स्थानिक कार्यालय हतबल झाले होते. नवीन वाहने घेणाऱ्या वाहनधारकांना भ्रमंती करताना वाहतूक पोलिसांनी रोखल्यास नोंदणी पुस्तक नसल्याने कारवाईची टांगती तलवार होती. यामुळे वाहनधारक नोंदणी पुस्तिका मिळावी, याकरिता कार्यालयात खेटा मारून त्रस्त झाले. या विभागाने तीन महिन्यांपूर्वी वाहनांच्या नोंदणीची संपूर्ण माहिती सारांश स्वरुपात कागदावर देण्यास सुरूवात केली. परंतु, हा तात्पुरता उपाय असल्याने कागदी वाहन नोंदणी पुस्तिका मुख्यालयाकडून मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. नव्या वाहनधारकांच्या नोंदणी पुस्तकाची अडचण या विभागाने पोलीस यंत्रणेला कळविली.

मुख्यालयाकडून या पुस्तिका जशा उपलब्ध होत आहे, तसतसे त्यांचे वितरण केले जाते. परंतु, पुस्तिकांची उपलब्धता कमी असल्याने आजदेखील मागील तीन महिन्यांतील १५ हजार वाहनधारकांच्या पुस्तिका देणे बाकी आहे. नाशिक उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारित नगर, मालेगाव, श्रीरामपूर ही कार्यालयेही आहेत.  या एकंदर स्थितीची माहिती देण्यात आल्यानंतर मुख्यालयाने नाशिक कार्यालयाला एक लाख क्रमांक देत स्थानिक पातळीवर नोंदणी पुस्तिका छापण्यास परवानगी दिली आहे. ही प्रक्रिया प्रगतिपथावर असून पुढील पंधरा दिवसात प्रलंबित वाहन नोंदणी पुस्तिकांचे वितरणास सुरुवात होणार असल्याचे या विभागातील अधिकारी राहुल कदम यांनी सांगितले.

वाहनाची नोंदणी झाल्यानंतर काही विशिष्ट दिवसांत पुस्तिका उपलब्ध होणे नियमाने बंधनकारक आहे. काही वाहनधारकांना पाच महिने तर काही वाहनधारकांना अडीच महिन्यांचा कालावधी होऊनही ती मिळालेली नव्हती. टपालाद्वारे ही नोंदणी पुस्तिका पाठविली जाते. पुस्तिका मिळत नसल्याने उपप्रादेशिक कार्यालयात चकरा मारून त्रस्तावलेल्या वाहनधारकांना पुढील काही दिवसात कागदी स्वरुपातील ती मिळणार आहे. आधुनिक तंत्रामुळे स्मार्ट प्रवास एक पाऊल मागे आल्याचे अधोरेखित झाले आहे.