येथील अशोका युनिव्हर्सल शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयावर पालकांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मनमानी शुल्कवाढीबरोबर दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी या शाळेमार्फत नववीतून दहावीत जाणाऱ्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो, अशी तक्रारही पालकांनी केली आहे.
अशोका युनिव्हर्सल शाळेकडून केल्या जाणाऱ्या शुल्क विनियमन व अन्य कायद्यांच्या भंगाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. महाराष्ट्र शुल्क विनियमन कायदा २०११ अमलात येऊन दीड वर्ष उलटत असून इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून मनमानी पध्दतीने दरवर्षी भरमसाठ शुल्क वाढ केली जात आहे. या बाबत अशोका युनिव्हर्सल, केंब्रीज स्कुल बाबत मंचकडे तक्रारी प्राप्त झाल्या. अशोका युनिव्हर्सलने शैक्षणिक शुल्कात एका वर्षांत ९३ टक्के वाढ केली आहे. ही बेकायदा शुल्क वाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी पालकांनी केली. नाशिक केंब्रिज व अशोका युनिव्‍‌र्हसल शाळा वर्षांकाठी फक्त दोन महिन्यांचे शैक्षणिक शुल्क सत्र शुल्क म्हणून घेण्याऐवजी तब्बल सहा ते सात महिन्यांचे शैक्षणिक शुल्क वसूल केले आहे. ते पालकांना परत मिळावे, या शाळांमधील पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीचे कामकाज नियमाप्रमाणे व पारदर्शक होत नाही व या संदर्भातील कागदपत्रे, शुल्कवाढीचे प्रस्ताव, लेखापरीक्षण झालेले हिशोब अशी महत्वाची कागदपत्रे पालकांना उपलब्ध करून दिली जात नाही, अशी तक्रारही करण्यात आली. याची सखोल चौकशी करत पालकांना आवश्यक ती कागदपत्रे देण्यात यावी, शालेय साहित्य व गणवेश यांच्या खरेदीची सक्ती पालकांवर केली जाऊ नये, नववीतून दहावीत जाणाऱ्या काही मुलांना दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी शाळा प्रवेश नाकारते. या बाबत शाळेला सूचना द्यावी, याकडे पालकांनी लक्ष वेधले. या शाळा सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांशी संलग्न असल्या तरी त्यांना कायदा बंधनकारक आहे. शिक्षण विभाग कारवाई केली जाईल असे आश्वासन देते. मात्र प्रत्यक्षात कृती करत नाही असा आरोप मंच व पालकांनी केला आहे. यावेळी मुकूंद दीक्षित, सचिन मालेगावकर, डॉ. मिलिंद वाघ, छाया देव, श्रीधर देशपांडे आदी मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.