बुधवारी घडलेल्या अपघातानंतर शुक्रवारी पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी निमाणी बसस्थानक ते काटय़ा मारुती चौकापर्यंतच्या वाहतुकीच्या बिकट परिस्थितीला महापालिका, पोलीस व संस्थेला जबाबदार धरले. वारंवार अपघात घडुनही सेवाकुंज चौकातील सिग्नल यंत्रणा बंद, गतिरोधकांची व्यवस्था नाही, वाहतूक पोलिसाची व्यवस्था नाही असे आक्षेप त्यांनी नोंदविले. पंचवटी एज्युकेशन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्था आपली जबाबदारी टाळत नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपायांसाठी पाठपुरावा करत असल्याचे म्हटले आहे. संबंधितांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..
अपघातांना पालिका जबाबदार
कुंभमेळ्यात गरज नसणाऱ्या कामांवर कोटय़वधींचा खर्च करण्यात आला. तथापि, पालक व स्थानिक नागरीक सातत्याने मागणी करत असलेल्या निमाणी बसस्थानक ते काटय़ा मारुती चौकापर्यंतचा उड्डाण पूल अथवा सेवाकुंज चौकात भुयारी मार्गाच्या मागणीकडे महापालिकेने आजवर दुर्लक्ष केले. या परिसरात आजवर अनेक अपघात झाले. विद्यार्थ्यांसह पालकांनाही जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. तथापि, पोलीस यंत्रणा एखादा अपघात झाल्यानंतर दोन-तीन दिवस वाहतूक व्यवस्थापनाचा देखावा करते. पुढे सर्व ‘जैसे थे’ म्हणजे अस्ताव्यस्त होऊन जाते. दोन दिवसांपूर्वी अपघातात रोनित चव्हाण या चिमुरडय़ाचा मृत्यू झाला. पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली. तथापि, शुक्रवारी सकाळी या चौकात कोणी वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. या परिसरातील दुर्घटनांना पालिका आणि पोलीस यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे.
योगिता गुरव, बानू शिंदे, नीलेश वर्णेकर

सिग्नल बंद, शाळेचा फलकही नाही
एक-दोन वर्षांपूर्वी सेवाकुंज चौकात बसने दुचाकीवरून जाणाऱ्या पालकास उडविले. पाल्याला नेण्यास ते शाळेत येत असताना तो अपघात घडला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वाहनांची वर्दळ असणाऱ्या चौकात लहान-मोठे अपघात नेहमीच घडत असतात. विद्यार्थ्यांसह पालक व स्थानिक नागरिकांनाही जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. कोणत्याही यंत्रणेला या स्थितीशी देणेघेणे नाही. सर्वांकडून आतापर्यंत टोलवाटोलवी झाली आहे. सेवाकुंज चौक वा निमाणी परिसरात या ठिकाणी तीन शाळा असून वाहने हळू चालवावीत, असा साधा फलकही लावलेला नाही. सिग्नल यंत्रणाही बंद आहे. चौकालगत आधी जे गतिरोधक होते, ते देखील काढून टाकण्यात आले. यामुळे वाहने भरधाव मार्गक्रमण करतात. पोलीस व महापालिकेने काही केलेले नाही.
रुपाली मटाले व पूजा जोशी

वाहनधारकांची दादागिरी
निमाणी बसस्थानक ते सेवा कुंज परिसरात विद्यार्थ्यांंना घेऊन रस्ता ओलांडताना मार्गस्थ होणारे वाहनधारक दादागिरी करतात. तुम्हाला आमची गाडी सापडली का, असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते. वाहनधारक बडबड करून निघून जातात. पोलीस नसल्याने आम्ही हतबल ठरतो. दोन दिवसांपूर्वी बसच्या धडकेत बालकाचा मृत्यू झाला. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आला. शुक्रवारी सकाळी मात्र तो नसल्याचे लक्षात आल्यावर जमलेल्या पालकांनी सेवाकुंज चौकात धाव घेऊन वाहतूक बंद पाडली. चौकातील सिग्नल यंत्रणा कधीपासून बंदच आहे.
– लता हांडगे व जय श्रीवास्तव

पंचवटी एज्युकेशनची जबाबदारी काय ?
संस्थेच्या आवारात काही घडले तर आमची जबाबदारी, पण शाळेच्या आवाराबाहेर काही घडले तर आमची जबाबदारी नाही असे संस्थेकडून सांगितले जाते. प्रवेश देताना संस्थेने आमच्याकडून मोठी देणगी घेतली. दरवर्षी भरमसाठ शुल्क आकारले जाते. इतकी रक्कम देऊनही संस्था जबाबदारी झटकत असल्यास त्यास काय म्हणावे ? शिक्षण संस्था शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत तीन ते चार कर्मचारी नेमू शकते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करू शकते. श्रीराम व नवभारत विद्यालयातील शिक्षक दररोज ही दक्षता घेत असतो. मात्र, श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीला अशी व्यवस्था का करता येत नाही. शिक्षण संस्थेने निमाणी बसस्थानकालगतचे प्रवेशद्वार विस्तृत करण्याची आवश्यकता आहे. आतील मोकळ्या जागेत पालकांना वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था करता येईल. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जातो. वारंवार ही मागणी करूनही संस्थाचालक धुतराष्ट्राची भूमिका घेतात.
काही संतप्त पालक