चारचौघांसारखे तिचे वैवाहिक आयुष्य..घरातील वातावरण मध्यमवर्गीय कुटुंबासारखे. खंत एवढीच की, घरी आल्यावर पतीचे मुलांसमोर दारू पिणे, मद्यपान झाल्यावर कोणाशीही संवाद न साधता आरडाओरड करत झोपून जाणे.. या प्रकाराला वैतागलेल्या तिने आपणच का हा त्रास सहन करावा, असा प्रश्न स्वत:ला विचारत मद्याने भरलेला प्याला जवळ केला. नकळत तीही मद्याच्या पूर्ण आहारी गेली. रुळावरून घसरलेली संसाराची दोन्ही चाके पूर्ववत होण्यास बराच वेळ लागला. आपले चुकतेय, याची जाणीव तिला मद्याच्या विळख्यातून बाहेर घेऊन आली. आनंदाची गोष्ट ही की, तिची व्यसनाधीनताच पतीलाही व्यसनमुक्त करणारी ठरली. आता हे चौकोनी कुटुंब जगण्यातील आनंद भरभरून घेत आहे.

नाशिक शहरातील मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत शहाणे (नाव बदलले आहे) कुटुंबीय वास्तव्यास आहे. पती राजेश, पत्नी प्रीती आणि दोन मुले असे चौकोनी कुटुंब वसाहतीत सर्वाच्या चर्चेचा विषय होते. राजेश सायंकाळी कामावरून घरी येतानाच सोबत आवडीचे मद्य घेऊन येत असे. टीव्हीसमोर बसून मद्यपान करणे, एकदा धुंदी चढली की क्षुल्लक कारणावरून प्रीतीशी वाद घालणे किंवा मुलांवर आरडाओरड, हा नित्याचा भाग झाला होता.

प्रीती सकाळी लवकर उठून पतीसह शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांचा स्वयंपाक करणे, घरातील आवरासावर, मुलांचा अभ्यास अशी गृहिणीची जबाबदारी लीलया पार पाडत होती. मुलांसोबत खेळण्याऐवजी राजेशला मद्याचा प्याला अधिक जवळचा होता. हीच गोष्ट प्रीतीला सलत होती. पतीला व्यसनाच्या विळख्यातून कसे सोडवावे, या विचाराने तिला रात्री झोप लागत नसे. गृहिणी, पत्नी, आई म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना राजेशची कुठेही साथ नाही, हा विचार तिला अस्वस्थ करत होता. विचारांच्या तंद्रीत एके रात्री सर्व झोपल्यावर तिने राजेशने कपाटात ठेवलेल्या मद्याच्या बाटलीतून एक प्याला भरला. तो झटक्यात रिता केल्यावर तिला काहीसे अस्वस्थ वाटले. मेंदूला झिणझिण्या आल्या, पण खूप दिवसांनी थोडय़ाच वेळात तिला शांत झोप लागली. झोप चांगली झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिला प्रसन्न वाटले. सर्व कामेही तिने उत्साहात आवरली. सायंकाळी राजेशची चिडचिड झाल्यावरही तिने हसतमुखाने कामे नेटाने पार पाडली. रात्री झोपताना नकळत ती कपाटातील त्या बाटलीकडे गेली. पुन्हा एक घोट घेत झोपली. हे असे दररोज होऊ लागले.

हा प्रकार राजेशच्या लक्षात येऊ नये, यासाठी सुरुवातीला ती थोडे पाणी टाकून बाटलीतील मद्य पुन्हा आहे त्या पातळीवर आणत असे. हळूहळू तिची मद्याची तहान वाढू लागली. तिने घरखर्चातून वाचविलेल्या पैशातून मद्यखरेदी सुरू केली. आपल्या बायकोलाही मद्याची सवय लागल्याचे हळूहळू राजेशच्या लक्षात आले. एकदा त्याने प्रीतीला मद्यपान करताना पाहिलेदेखील. तिला समजावण्याचा प्रयत्न केल्यावर ती त्याच्यावरच चिडली. तुमच्यामुळे आपल्याला ही सवय लागली, आता ही तहान तुम्हीच भागवा, असा लकडा तिने लावला. यातून वाद होऊ लागल्याने राजेशने वैतागून तिला मद्य आणून देण्याचे मान्य केले, परंतु मुलांसमोर मद्यपान करायचे नाही, हा नियम दोघांनी ठरवून घेतला. मुलांना लवकर झोपवून दोघेही एकत्र दारू प्यायचे आणि मग झोपायचे. या काळात प्रीती दिवसेंदिवस अधिक मद्य घेऊ लागल्याने ती पूर्णपणे मद्याच्या आहारी गेल्याचे राजेशला कळून चुकले. प्रीतीलाही आपण चुकत आहोत, यातून बाहेर पडायला हवे याची जाणीव झाली. आठवडाभर मद्यपान न केल्याने तिला त्रास होऊ लागला. हाताचा थरकाप, झोप न लागणे, नैराश्य यामुळे ती पुन्हा मद्यपान करू लागली.

कोणाला तरी हे सांगावे यासाठी तिने मावशीला आपणास जडलेल्या व्यसनाची माहिती दिली. मावशीने समजावून पाहिले, पण तिची मानसिकता पाहता अखेर त्यांनी डॉ. आनंद पाटील (सहारा व्यसनमुक्ती केंद्र) गाठले. डॉ. पाटील यांनी प्रदीर्घ काळ समुपदेशन करून प्रीतीला मद्यपानापासून परावृत्त केले. या काळात तिला होणारा त्रास टाळण्यासाठी आवश्यक औषधे सुरू केली. कालांतराने मद्याची ओढ कमी झाली. झोपही व्यवस्थित होत असल्याने तिने मद्यापासून कायमचे दूर जाण्याचा निर्णय घेतला. राजेशही व्यसनमुक्त झाला. मुलांना त्यांचे व्यसनमुक्त आई-वडील परत मिळाले आहेत.

व्यसनविळख्यातून तोही सुटला..

डॉ. आनंद पाटील यांनी प्रीतीला समुपदेशन करतानाच राजेशला बोलावून घेतले. प्रीतीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तुलाही व्यसनमुक्त व्हावे लागेल, अन्यथा तिचे वाढत जाणारे मद्यपान तिच्या प्रकृतीसह घरातील कौटुंबिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारक ठरणार असल्याचा इशारा दिला. समुपदेशन आणि औषधोपचारातून आज प्रीती आणि राजेश हे दाम्पत्य व्यसनमुक्त झाले आहे.