अमेरिकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञानाविषयी कार्यानुभव घेण्यास अनेक पर्याय उपलब्ध असतात. उपग्रहाची निर्मिती हा त्यातील नियमित भाग. तथापि, ‘इस्त्रो’ भारतातील तरुण पिढीला या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची प्रगती होईलच. शिवाय, तरुणांना या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळेल.. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी व्यक्त केलेला हा विश्वास. मणिपाल इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजीत (एमआयटी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या नाशिकच्या शुभंकर दाबककडून विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या ‘परिक्षित’ या ‘नॅनो’ उपग्रहाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने अंतराळ मोहिमांच्या जगात मोठी झेप घेत एकाचवेळी २० उपग्रह अंतराळात सोडून अनोख्या कामगिरीची नोंद केली. त्यात चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठाचा ‘सत्यभामा सॅट’ आणि पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘स्वयंम्’ या नॅनो उपग्रहांचाही समावेश आहे. या मोहिमेमुळे संबंधित विद्यार्थ्यांना उपग्रह निर्मितीची अनुभूती मिळाली. अवकाश संशोधन क्षेत्रात इस्त्रोने उपलब्ध केलेल्या संधीतून ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांनीही ‘परिक्षित’ या उपग्रहाची निर्मिती केली आहे. चाचणीच्या अंतिम टप्प्यात असणारा हा उपग्रह लवकरच इस्त्रोकडे सोपविला जाईल. या प्रक्रियेत महत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या शुभंकरला गतवर्षी इस्त्राईलमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल काँग्रेस या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या परिषदेत सहभागी होऊन शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाली. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, इस्त्रो या संस्थातील शास्त्रज्ञ त्यात सहभागी होतात. त्यावेळी शुभंकरची विल्यम्स यांच्याशी भेट झाली. भारतातील महाविद्यालयीन तरुणांकडून निर्मिल्या जाणाऱ्या उपग्रहांविषयी विल्यम्स यांनी आनंद व्यक्त केला. जगभरातील प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ सहभागी होणाऱ्या या परिषदेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अपवादाने स्थान मिळते. शुभंकरचा शोध निबंध या परिषदेसाठी निवडला गेला. जेरुसलेम येथे झालेल्या या परिषदेत त्याने ‘अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅण्ड पॅसिव्ह प्रोटेक्शन टेक्निक्स फॉर लो अर्थ ऑरबीट सॅटेलाईट्स’ या विषयावर सादरीकरण केले. परिषदेच्या निमित्ताने सुनीता विल्यम यांच्यापासून ते चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या बझ अल्डरिन यांच्यापर्यंतच्या दिग्गज प्रभृतींशी त्याची भेट झाली.

फ्रावशी अकॅडमीत शालेय शिक्षण घेणाऱ्या शुभंकरने बारावीपर्यंतचे शिक्षण अशोका युनिव्हर्सल कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी तो ‘एमआयटी’मध्ये दाखल झाला. ‘परिक्षित’ उपग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेशी शुभंकर दोन वर्षांपासून जोडलेला आहे. आकाराने अतिशय लहान असलेल्या या उपग्रहाचे वजन आहे दोन किलो ३०० ग्रॅम. भारतीय उपखंडातील तापमान वाढीचे निरीक्षण त्याच्यामार्फत करण्यात येईल. थर्मल इमेजिंग कॅमेऱ्यांच्या सहाय्याने टिपलेली छायाचित्र तो एमआयटीतील नियंत्रण कक्षात पाठवेल. साधारणत: सहा महिने ते एक वर्ष इतके त्याचे आयुर्मान आहे. या उपग्रहात काही वैशिष्टय़पूर्ण तंत्राचा वापर करण्यात आला आहे. अंतिम चाचण्यांचा टप्पा पार पडल्यानंतर जुलै अखेरीस तो इस्त्रोकडे सोपविला जाईल. त्याच्या अवकाश उड्डाणाची तारीख इस्त्रो निश्चित करणार आहे. विविध शाखांचे शिक्षण घेणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून हा उपग्रह आकारास आला आहे. यांत्रिकीचे शिक्षण घेताना या प्रयोगाद्वारे अंतराळ संशोधनात व्यावसायिक पातळीवर हाताळल्या जाणाऱ्या आज्ञावलींचे सखोल ज्ञान मिळाले. इस्त्रो संस्थेतील शास्त्रज्ञांकडून या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळाले. या क्षेत्रातील विविध संधीची माहिती प्राप्त झाली. ही बाब आपणासह ‘परिक्षित’च्या निर्मिती प्रक्रियेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्याचे शुभंकरने नमूद केले. विद्यार्थी उपग्रह निर्मिती प्रक्रियेत शुभंकरच्या माध्यमातून नाशिकचाही सहभाग नोंदवला गेला आहे.