नाशिक : पावसाळ्यात शहरातील जुने वाडे-इमारती, कच्ची बांधकामे कोसळण्याच्या घटना वाढतच असून रविवारी रात्री त्यात पंचवटीतील एका इमारतीची भर पडली. मखमलाबाद रस्त्यावरील  मधुबन कॉलनीतील जुन्या इमारतीचा मोठा भाग कोसळला. रहिवाशांना महिनाभर आधीच स्थलांतरित केले असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. इमारतीत अडकून पडलेल्या एका व्यक्तीची अग्निशमन दलाने सुटका केली. इमारतीचा बराचसा भाग कोसळल्याने ती धोकेदायक बनली आहे. तिचे तातडीने पाडकाम करावे, अशी नोटीस महापालिकेने बजावली.

पावसाळ्यात जुने वाडे, इमारती, घरांच्या भिंती, कच्चे बांधकाम कोसळण्याच्या आतापर्यंत शहरात चार घटना घडल्या असून त्यात काहींना प्राण गमवावे लागले, तर काही जण जखमी झाले. त्यात पंचवटीतील घटनेची भर पडली. रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. सोमवारी पहाटे एकच्या सुमारास मधुबन कॉलनीतील ‘हर्षवर्धन-ए’ इमारतीचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी इमारतीत मनोज दुसाने ही एकमेव व्यक्ती होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी अग्निशमन केंद्रातील जवान घटनास्थळी धडकले. घरात अडकून पडलेल्या दुसाने यांची सुटका केली. ही इमारत ४० वर्षांपूर्वीची आहे. बांधकाम जुने झाल्यामुळे ती राहण्यायोग्य नसल्याचे पालिकेने आधीच बजावले होते. इमारतीत १२ सदनिका आणि काही गाळे आहेत. महिनाभरापूर्वी तेथील रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु, दुसाने यांनी सदनिका सोडली नव्हती. अन्य इमारत रिक्त असल्याने जीवित हानी टळली. या दुर्घटनेनंतर इमारत अधिक  धोकादायक झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अर्धवट कोसळलेल्या अवस्थेतील इमारत तशीच ठेवणे धोकेदायक आहे. ती इमारत जमीनदोस्त करावी, अशी नोटीस बजावण्यात आल्याचे विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले.

पावसाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन पालिकेने धोकादायक घरे, वाडे रिकामी करण्यासाठी मोहीम राबविली आहे. त्या अंतर्गत काझीगढी परिसरातील ७० हून अधिक रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात आले. पालिकेने नोटीस बजावलेल्यात पंचवटीमध्ये सर्वाधिक १५०, तर सातपूर विभागात सर्वात कमी म्हणजे १५ धोकादायक वाडे, इमारती आणि घरे आहेत. नाशिक पश्चिममध्ये १०३, नाशिकरोड ६७, नाशिक पूर्व ३९, सिडकोमध्ये २३ धोकादायक घरे, इमारतींना रिक्त करण्याची नोटीस बजावली गेली. बहुतांश वाडय़ांमध्ये भाडेकरू वास्तव्यास आहेत. राहती घरे सोडल्यास आपला हक्क संपुष्टात येईल या धास्तीमुळे ते घरे सोडत नाहीत. पावसाची तीव्रता वाढत असताना अशी घरे मोकळी करताना पालिकेची दमछाक होत आहे.