संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मसमर्पण दिन यानिमित्त नाशिक एज्युकेशन सोसायटीचे २३ हजार विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकाच दिवशी व एकाच वेळी पसायदान आणि जयोत्सुते गीत सादर करणार आहेत.
या बाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, प्रा. दिलीप फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीस ७२५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २१ डिसेंबर रोजी पसायदान तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रायोपवेशनास ५० वर्ष पूर्ण होत असल्याने २६ फेब्रुवारी रोजी जयोत्सुते या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९२३ मध्ये स्थापन झालेल्या ‘नाएसो’ राज्यातील अग्रणी संस्था म्हणून ओळखली जाते. संस्था इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शिशुवृंद, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुमारे २५ हजार विद्यार्थी आणि संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांपर्यंत भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख कायम टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन करते. वंदे मातरम् गीताला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सामूहिकपणे वंदे मातरम् गीताचे गायन करून एक अभिनव उपक्रम यशस्वी केला होता. संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी १८५७ च्या लढय़ात देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आणि विद्यार्थ्यांसह नाशिककरांपर्यंत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी क्रांतिकारकांचे विचार पोहोचविण्याचा आगळावेगळा उपक्रमही यशस्वीपणे राबविला आहे. शैक्षणिक उपक्रम समिती व आजीमाजी विद्यार्थी-शिक्षक-कर्मचारी यांचा कलामंच यांच्या सहकार्याने संस्थेने पसायदान व जयोत्सुते गीत सादर करण्याचा संकल्प केला आहे. शाळांचे सत्र लक्षात घेऊन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रहाळकर यांनी केले. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत, वंदे मातरम्, पसायदान, जयोत्सुते आदींचा समावेश असणारी छोटी पुस्तिकाही देण्यात येणार आहे.