नाशिक : बेशिस्त आणि वाहतूक पोलिसांवरच गुरगुरणाऱ्या रिक्षाचालकांबद्दल वाहतूक विभाग नरमाईची भूमिका घेत असल्याचे चित्र शहर परिसरात वारंवार दिसून येते. रिक्षा चालकांबद्दल काही तक्रार करायची असेल तर जवळच्या पोलीस ठाण्याचा रस्ता वाहतूक पोलिसांकडून दाखविला जात असल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजी आहे.

शालिमार, सीबीएस, नाशिकरोड, सातपूर, सिडकोसह पंचवटी परिसरात ठिकठिकाणी बेशिस्त रिक्षा चालकांची वाढलेली मुजोरी ठळकपणे समोर येत राहते. बस थांब्यावर अतिक्रमण करत रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या करत वाहनचालकांना तसेच प्रवाश्यांना अडथळा निर्माण करण्यात काही रिक्षा चालकांचा हातखंडा आहे. प्रवासी भरण्याच्या नादात जोरजोरात आरडाओरड करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, रिक्षातील प्रवाश्यांना त्रास होत असेल तरीही मोठय़ा आवाजात गाणी लावणे हे प्रकार नित्याचे आहेत. असाच अनुभव एका युवतीला आला. अशोक स्तंभ परिसरातून गंगापूर रोडवरील घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. रिक्षाचालक अन्य प्रवाश्यांसह रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांशी उर्मटपणे तसेच असभ्यपणे वागत होता. रिक्षा सुरू होताच त्याने मोठय़ा आवाजात गाणी लावली होती.  दुसरीकडे सातत्याने विनाकारण हॉर्न वाजविण्याचे काम सुरू होते. त्याला हॉर्न वाजवू नको, गाण्यांचा आवाज कमी कर, अशी सूचना संबधित युवतीने केली असता त्याने त्या युवतीशीच वाद घातला. अखेर या प्रकाराला वैतागत तीने अर्ध्यातच प्रवास थांबवत रिक्षातून उतरणे योग्य समजले.

रिक्षातून उतरल्यावरही त्याने तिला कट मारला. या सर्व प्रकाराची तक्रार करण्यासाठी तीने रिक्षाचे छायाचित्र काढले असता रिक्षाचालक निर्लज्जपणे माझाही फोटो काढा म्हणजे तुम्हाला सोईस्कर होईल असे उत्तर देऊन पुढे निघून गेला. समोर असणाऱ्या वाहतूक पोलिसाला तीने सर्व प्रकार सांगितला. संबधित वाहतूक पोलिसांने तिला आपण काहीच करू शकत नाही असे सांगितले.