रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदारांना साकडे
लासलगांव रेल्वे स्थानकावर कामयानी व नंदिग्राम एक्स्प्रेस थांबत नसल्याने परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत असून या रेल्वे गाडय़ांना लासलगाव येथे थांबा मिळावा, अशी मागणी लासलगांव प्रवासी संघटनेच्या वतीने जिल्ह्य़ातील खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांना देण्यात आले. थांबा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.
लासलगांव व परिसरातील गावांमधून मोठय़ा संख्येने नोकरी, व्यवसाय, शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने प्रवासी नाशिक, इगतपुरी, कल्याण, ठाणे, व मुंबईपर्यंत दररोज ये-जा करतात. त्यातही नाशिक येथे जाणाऱ्यांची संख्या ८० टक्के असून विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन वेळ सकाळची असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना सकाळी पंचवटी व सेवाग्राम एक्स्प्रेसने प्रवास करावा लागतो. या विद्यार्थ्यांना दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर नाशिकहून परत लासलगावला येण्यासाठी कुठलीही रेल्वे गाडी नसल्याने त्यांना सायंकाळी सहापर्यंत ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ नाहक वाया जातो. दुपारच्या वेळी जाणाऱ्या एखाद्या प्रवासी गाडीस लासलगावचा थांबा मिळाल्यास विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर होऊ शकतो. दुपारच्या सत्रात कामयानी, पवन एक्स्प्रेस या गाडय़ा आहेत. परंतु, त्या लासलगाव येथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग होत नाही. या गाडय़ा लासलगाव येथे थांबल्यास विद्यार्थ्यांची समस्या कायमची दूर होऊ शकेल. त्यासाठी लासलगाव येथे काययानी, पवन एक्स्प्रेस या गाडय़ांना थांबा मिळण्याची गरज आहे.
सायंकाळी नाशिक येथून लासलगांवकडे येण्यासाठी सहा वाजता हुतात्मा एक्सप्रेस, ६.२० वाजता गोदावरी एक्स्प्रेस, ६.३० वाजता सेवाग्राम एक्स्प्रेस आणि ६.३८ वाजता शटल या गाडय़ा आहेत. म्हणजेच पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने चार गाडय़ा आहेत. परंतु, त्यानंतर लासलगांवकडे जाण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेसशिवाय एकही गाडी नाही. नाशिकमध्ये रोजगारासाठी येणारे अनेक चाकरमाने हे अंबड, सातपूर, गोंदे येथील औद्योगिक वसाहतींमध्ये येत असतात. या वसाहती शहरापासून काही अंतरावर असल्याने सायंकाळी कामगारांची कामाची वेळ सुटल्यावर रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यास त्यांना किमान पाऊण तास तरी लागत असतो. त्यामुळे त्यांना सहा ते साडेसहा या वेळेतील एकही गाडी सापडू शकत नाही. पंचवटी एक्स्प्रेससाठी पावणेतीन तास त्यांना रेल्वे स्थानकावर वेळ घालवावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करता आठ वाजेच्या सुमारास असलेल्या नंदिग्राम एक्स्प्रेसला लासलगांव येथे थांबा मिळाल्यास कामगारांचा वेळ वाया जाणार नाही. लासलगाव प्रवासी संघटनेच्या वतीने खासदारांना दिलेल्या निवेदनात हे सर्व नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना लासलगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, राम बोराडे, सचिन पवार, योगेश पारीख आदी उपस्थित होते. लासलगाव परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी कायम पाठपुरावा करत असल्याने काही समस्या मार्गी लागल्या असल्याचे प्रवाशांनी नमूद केले.