नाशिक : शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या इमारतीतून काही महिन्यात दोन रुग्णांनी उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा शासकीय रुग्णालयात तसा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

रविवारी रात्री मनोरुग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संदर्भ सेवा रुग्णालयाच्या उंच इमारतीवरून उडी मारून दोन रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना मागील दोन महिन्यात घडल्या. यामुळे या इमारतीत तसे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याची मागणी रुग्णाचे नातेवाईक करीत आहेत. त्यातच त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा शासकीय रुग्णालयात तसा प्रकार घडला.

संदर्भ रुग्णालयाच्या तुलनेत जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या कित्येक पटीने अधिक आहे. ग्रामीण भागासह गोरगरीब रुग्णांना या ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली जाते. २३ फेब्रुवारी रोजी या रुग्णालयात मानसिक आजारावरील उपचारासाठी सुनील रामदास शिंदे (२७, कुंभारगल्ली, देवळाली गाव) दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास शिंदे याने मनोरुग्ण कक्षाच्या खिडकीतून अकस्मात उडी मारली. त्याला मुका मार लागला.

हे लक्षात येताच वडील रामदास शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमी सुनीलला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.