शैक्षणिक साहित्य मिळण्यास येणाऱ्या अडचणींवरील उपाययोजना
नाशिक : ‘करोना’ विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढत असल्याने लागु करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका वेगवेगळ्या घटकांना बसत आहे. शिक्षण विभागही यास अपवाद राहिलेला नाही. करोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीमुळे यंदा शैक्षणिक वर्ष उशीराने सुरू होईल तसेच शैक्षणिक साहित्य मिळण्यात अडचणी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पीडीएफ पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास सुरूवात झाली आहे.
सद्यस्थितीत देशपातळीवर असलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग व्यवसाय ठप्प आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गरजा पूर्ण करण्यात नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षण विभागही यास अपवाद नाही. परीक्षा स्थगित किंवा रद्द केल्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा, आवश्यक शैक्षणिक साहित्याची पूर्तता, विद्यार्थ्यांची मानसिकता अशा वेगवेगळ्या अडथळ्यांची शर्यत शिक्षण विभागाला पार करायची आहे. सध्या समाजमाध्यमांवर वह्य़ा पुस्तके जपून ठेवा, ती पुढील वर्षांत अन्य कोणाला वापरता येतील, असा संदेश फिरत आहे. काही शाळांकडून पालकांना लघुसंदेशाद्वारे अशाच पध्दतीने सुचित करण्यात आल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ऑनलाईन पीडीएफ पुस्तके डाऊनलोड करून काही पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घरीच घेण्यास सुरूवात केली आहे. परंतु, नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, शैक्षणिक साहित्याची जमवाजमव कशी करायची, अशा शंका पालकांकडून उपस्थित होत आहेत. याविषयी वैशाली शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी मुलगी सीबीएसईशी संबंधित आहे. मेमध्ये त्यांच्या नव्या शैक्षणिक वर्षांस सुरूवात होते. त्याआधीच पुस्तके, वह्य़ा यासह अन्य शैक्षणिक साहित्य शाळेकडून वितरीत होते. मात्र मार्चमध्ये करोनाचे संकट उद्भवले. परीक्षा झाली. मात्र निकाल अद्याप हाती आलेला नाही. शाळेकडून ऑनलाईन शिकविण्यास सुरूवात झाली असली तरी नव्या शैक्षणिक वर्षांचे काय, असा प्रश्न शिरसाठ यांनी उपस्थित केला. निर्जला देशपांडे यांनी शाळेकडून आलेल्या संदेशाकडे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी वह्य़ा पुस्तके रद्दीत देऊ नये. पुढील शैक्षणिक वर्षांत वह्य़ा पुस्तकांचा वापर करावा लागेल, अशी सुचना करण्यात आली असल्याचे सांगितले. ‘सर्व शिक्षा अभियान’ अंतर्गतही पुस्तके वितरण होण्यास विलंब होणार असल्याने नव्या शैक्षणिक वर्षांत वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले.
पालकांनी संभ्रमित होऊ नये
करोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होईल. परंतु, दिवाळीच्या सुटीत कपात करत ही कसर भरून काढण्यात येईल. जिल्ह्य़ातील बहुतांश शाळांनी ऑनलाईन पीडीएफ पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली आहेत. काही पुस्तके कुरियर सेवा सुरू झाल्यावर घरपोच दिली जाणार आहेत. पालकांनी आता घरीच मुलांचा अभ्यास सुरू करावा. जुन्या वह्य़ा, पुस्तकांचा वापर हा केवळ नवे साहित्य उपलब्ध होईपर्यंत असेल. ती शाळांनी जमा करून अन्य विद्यार्थ्यांना मोफत वितरीत केल्यास यामुळे सामाजिक बांधिलकी जपली जाईल. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातूनही पुस्तके उपलब्ध होतील. मात्र त्यास थोडा वेळ लागेल.
– नितीन उपासनी (शिक्षण उपसंचालक, राज्य शिक्षण मंडळ, नाशिक विभाग)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 2:24 am