08 March 2021

News Flash

शहर व ग्रामीण भागांत जनजीवन सुरळीत

पोलीस दप्तरी दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्य़ातील संशयितांची धरपकड सुरू आहे.

नाशिकरोड भागात संचलन करताना पोलीस.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतील सहा गावांमध्ये संचारबंदी

पोलीस यंत्रणा सर्वशक्तीनिशी रस्त्यावर उतरल्यानंतर आणि दगडफेक व जाळपोळीच्या तत्सम प्रकारांना चिथावणी देणाऱ्यांना दंडुका बसू लागल्यानंतर गुरुवारी शहर व ग्रामीण भागात तणाव निवळून शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळाली. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील सहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आजपासून शाळा व महाविद्यालये नियमितपणे सुरू झाली. पोलीस दप्तरी दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्य़ातील संशयितांची धरपकड सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपवासी नगरसेवक पवन पवारच्या घरातून पिस्तुले, तलवार व जांबियासारखी घातक शस्त्र जप्त करण्यात आली.

तळेगावच्या घटनेनंतर चार दिवसांपासून नाशिक शहर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर परिसरात निर्माण झालेला तणाव निवळण्यास सुरुवात झाली. आदल्या दिवशी पोलिसांनी कुमक मागवून अनेक भागांत संचलन केले. यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी सकाळपासून त्याचे प्रत्यंतर पाहावयास मिळाले. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पीडित बालिकेच्या पालकांची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. शांतता प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही समाजघटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. आणि पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी अनेक गावांना भेटी देऊन स्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांच्या बैठका घेऊन शांतता पाळण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाने आवश्यकतेनुसार आठ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचे निर्देश दिले होते, परंतु केवळ सहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. या गावांमध्ये सलग चोवीस तास संचारबंदी लागू न करता केवळ सूर्यास्त ते सूर्योदय अशा बारा तासांसाठी ती लागू करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी, वाडिवऱ्हे व नाशिक शहरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये या काळात गुन्हे दाखल झाले. त्या प्रकरणातील संशयितांची धरपकड सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक पवारच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात दोन पिस्तूल, तलवार व जांबिया ही शस्त्रे आढळून आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. मुंबई नाका येथे इनोव्हा वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी शहरात शांतता होती. दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचे पाहावयास मिळाले. यामुळे महामंडळाच्या तुरळक बसगाडय़ा रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली. मात्र कसारा, नाशिकरोड, भगूर आणि त्र्यंबक मार्गावरील बस वाहतूक महामंडळाने बंद ठेवली. तणाव स्थितीचा सर्वाधिक फटका एसटीला बसला. यामुळे महामंडळाने लांब पल्ल्यासह शहर बस वाहतूक सेवा बंद ठेवली. दसऱ्याच्या दिवशी ही सेवा तुरळक स्वरूपात सुरू झाली, परंतु सायंकाळी तणाव निर्माण झाल्याने पुन्हा ती बंद केली गेली. दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने नाशिक जिल्ह्य़ातून दिवसागणिक मिळणारे ६० ते ७० लाखांचे उत्पन्न बुडाले. तणाव निवळल्याने तसेच प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दुपारनंतर टप्प्याटप्प्याने बसगाडय़ा सोडण्यास सुरुवात केली. धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे यासह अन्य लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसह शहर बस वाहतूक सुरू करण्यात आली. त्र्यंबक, घोटी तसेच शहरातील काही भागांत तणाव असल्याने कसारामार्गे जाणाऱ्या बसेस तसेच भगूर, नाशिकरोडकडे जाणारी शहर बस वाहतूक व त्र्यंबकेश्वरकडील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अ‍ॅट्रॉसिटीचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची गरज

नाशिक जिल्ह्य़ातील तणाव निवळण्यासाठी सर्व समाजाने शांतता व सुव्यवस्था राखून एकमेकांच्या सुख-दु:खाचे साथीदार व्हावे, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मनमाड येथे केले. मनमाड शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या सामाजिक घटनांचा त्यांनी आढावा घेतला. जे समाजकंटक सामाजिक तेढ व वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशा घटनांमागे फडणवीस सरकार बदनाम व्हावे, असा उद्देश असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅट्रॉसिटी कायदा दलित, वंचित समाजघटकांच्या संरक्षणासाठी आहे. त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असेही त्यांनी सुचविले. सरकारने समाज सुरक्षेसाठी अनेक हिताचे कायदे केले, त्याचा दुरुपयोग होत नाही काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

– आ. जोगेंद्र कवाडे

दोन्ही घटकांनी शांतता प्रस्थापित करावी

तळेगाव येथे घडलेली घटना निंदनीय आहे. जिल्ह्य़ात निर्माण झालेला तणाव दोन्ही समाजघटकांनी वाढू न देता स्थानिक पातळीवर मिटविण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणात कालहरण कसे होईल असा सरकारचा प्रयत्न राहील. भाजप सरकारचा छुपा अजेंडा वेगळाच आहे. त्यांना देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्दय़ावर संबंधितांकडून चालढकल केली जाईल.

– प्रकाश आंबेडकर (अध्यक्ष, भारिप)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:10 am

Web Title: peace in nashik city
Next Stories
1 असा ‘बाहुबली’ भाजपला चालतो कसा?
2 वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात १२ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग
3 ‘ऑक्टोबर हीट’मुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट
Just Now!
X