भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका वयोवृद्ध निवृत्तिवेतनधारकांना बसत आहे. काही महिन्यांपूर्वी निवृत्तिवेतनधारकांनी उपरोक्त कार्यालयात खेटा मारून निवृत्तिवेतन बँक खाते आधारला जोडून घेतले. प्रत्येकाला विशिष्ट क्रमांकही दिला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करूनदेखील निवृत्तिवेतन जमा होत नसल्याने शेकडो वयोवृद्धांना पुन्हा एकदा या कार्यालयात खेटा मारण्याची वेळ आली आहे. सोमवारी शेकडो वयोवृद्ध निवृत्तिवेतनधारक सातपूरच्या कार्यालयात बसले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याची तक्रार संबंधितांनी केली.

सातपूरच्या आयटीआय पुलालगत भविष्य निर्वाह निधीचे कार्यालय आहे. सहकारी बँकसह अनेक आस्थापनांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना ईपीएफ ९५ अंतर्गत निवृत्तिवेतन दिले जाते. संबंधितांचे खाते ज्या बँकेत आहे, त्या ठिकाणी दरवर्षी ऑक्टोबरमध्ये हयातीचा दाखला घेतला जातो. नेहमीच्या पद्धतीत संबंधित कार्यालयाने बदल केले. निवृत्तिवेतनधारकांना कार्यालयात बोलावत त्यांचे निवृत्तिवेतन बँक खाते आधारशी जोडण्याची प्रक्रिया करण्यात आली. जवळपास दोन महिने हे काम सुरू असल्याचे निवृत्तिवेतनधारकांकडून सांगण्यात आले.  तेव्हा या कार्यालयात ज्येष्ठांची अशीच गर्दी झाली होती. ही प्रक्रिया पार पडूनही निवृत्तिवेतन बँक खात्यात जमा न झाल्याची तक्रार घेऊन संबंधित मंडळी सकाळपासून कार्यालयाबाहेर रांग लावून बसली.  सकाळपासून अनेक ज्येष्ठ नागरिक कित्येक तास रांगेत बसून होते.

शंकांचे निरसन करण्यासाठी अनेकांना नव्याने दुसऱ्या रांगेत थांबावे लागले. इतके होऊनही कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने समाधान केले नसल्याची तक्रार अनेकांनी केली. काही ज्येष्ठ निवृत्तिवेतनधारकांना ऐकावयास कमी येते. त्यांच्या वयोमानाचाही सुरक्षारक्षकांनी विचार केला नसल्याची तक्रार करण्यात आली.

पुन्हा अर्ज

बँक खाते व आधार संलग्न करूनही आता नव्याने पुन्हा जुना अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. या संदर्भात  कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता अर्ज भरावाच लागेल असे सांगितले गेले. जुनाच अर्ज भरणे क्रमप्राप्त राहणार असताना मध्यंतरी बँक खाते व आधार संलग्न करण्याचे कारण काय होते, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.