कठोर टाळेबंदीच्या निर्णयामुळे खरेदीसाठी झुंबड

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात बुधवारपासून १२ दिवस कठोर टाळेबंदी लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी शहरातील बाजारपेठांमध्ये किराणा, भाजीपाला, इंधन आदी खरेदीसाठी इतकी झुंबड उडाली की, नियमांची एैशी की तैशी झाली. सकाळी सात वाजेपासून नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सर्वत्र रांगा आणि गर्दी असे चित्र दिसून आले. मध्यवर्ती भागातील रस्ते वाहनांनी  ओसंडून वाहू लागले. रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, रामवाडी पूल, अमृतधाम, पेठरोड अशा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

कडक निर्बंध लागू करूनही करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने १२ ते २३ मे या १२ दिवसांसाठी शहरासह जिल्ह्य़ात पूर्णत: टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी दुपारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे. या काळात अत्यावश्यक वा वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. किराणा मालासह बेकरी, मिठाई दुकाने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी विशिष्ट कालमर्यादेत सुरू असतील. पण, मागणी नोंदवून ते घरी मागविता येईल. बाजार समित्या बंद राहणार असल्या तरी किरकोळ विक्रेत्यांना कॉलनी परिसरात किं वा फिरत्या वाहनाद्वारे भाजीपाला विक्रीला मुभा राहणार आहे. म्हणजे जीवनावश्यक वस्तू मिळण्यास फारशी अडचण येणार नसताना टाळेबंदीचा नागरिकांनी प्रचंड धसका घेतल्याचे पुन्हा पाहायला मिळाले.

भल्या सकाळपासून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू लागले. मुख्यत्वे वाण सामानाच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. रविवार पेठ, रविवार कारंजा परिसरात चालणे अवघड झाले होते. शुक्रवारी अक्षय्य तृतीया आहे.

टाळेबंदीत सणानिमित्त आंबे तसेच इतर खरेदीसाठी बाहेर पडणे अवघड होईल हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने खरेदी सुरू होती. हे चित्र सिडको, गंगापूर रोड, पंचवटी, इंदिरानगर, नाशिकरोड, सातपूर अशा सर्वच भागात पाहायला मिळाले. करोनाच्या नियमावलीचा अनेकांना विसर पडला होता. अनेक ठिकाणी सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले गेले नाही. सर्व प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वर्दळ होती. रविवार कारंजा, पंचवटी कारंजासह रामवाडी पुलावर वाहतूक कोंडी झाली. यातून बाहेर पडण्यासाठी वाहनधारकांना १५ ते २० मिनिटे तिष्ठत रहावे लागले. बाजार समितीलगतचे पेठ-दिंडोरी रस्ता भाजीपाला विक्रेते-ग्राहकांनी फुलून गेला होता.

जमेल तितका भाजीपाला, फळे खरेदी करण्याची धावपळ सुरू होती. वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीत अडथळे आले. पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या. टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेतील वाहनधारक वगळता अन्य वाहनधारकांना इंधन देण्यास प्रतिबंध आहे. घराबाहेर पडण्यावर निर्बंध असताना वाहनात इंधन भरण्याची धडपड अनाकलनीय ठरली. बँकांबाहेर वेगळी स्थिती नव्हती.  बँकेचे व्यवहार उरकून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न होता.

यंत्रणाही हतबल

शहरातील अनेक भागात नियमांचा अव्हेर होत असतांना महापालिका वा पोलीस यंत्रणेकडून त्यास चाप लावण्याचे प्रयत्न झाले नाही. मध्यंतरी पालिका, पोलिसांची वाहने ध्वनिक्षेपकाद्वारे दुकानदार, नागरिकांना सूचना देण्याचे काम करीत असत. या दिवशी तसे कुठेही झाल्याचे दिसले नाही. रविवार कारंजा वा अन्य ठिकाणी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. या दिवशी इतकी गर्दी उसळेल, याचा यंत्रणेला बहुदा अंदाज नव्हता. गर्दीसमोर यंत्रणाही हतबल झाल्याचे चित्र होते.

ग्रामीण भागातही खरेदीसाठी गर्दी

जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून कठोर टाळेबंदीची घोषणा केल्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. बँक, किराणा दुकाने, पेट्रोलपंप आदी ठिकाणी गर्दी झाली. गर्दीमुळे करोना नियमांचे उल्लंघन झाले.

करोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ दिवस कठोर टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दुपारपासून टाळेबंदीची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी साडे सात वाजेपासून नागरिकांनी किराणा, भाजीपाला खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी गर्दी केली. सटाणा शहरातील बाजारपेठ तसेच प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील बाजारपेठेच्या मुख्य शहरांमध्ये यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. गर्दीमुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला.

नामपूर रस्ता, साठ फु टी रस्ता, टिळकरोड, ताहाराबाद रोड, मल्हार रस्ता आदी प्रमुख बाजार पेठेत नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. बँकांची वेळ बदलल्याने ग्राहकांनी सकाळी आठ वाजेपासूनच बँकांबाहेर गर्दी केल्याचे बघायला मिळाले. १२ मेपासून खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल मिळणार नसल्याने सकाळपासून पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी दुचाकीसह इतर खासगी वाहनांची रिघ लागली होती. यामुळे करोना नियम पायदळी तुडवल्याचे अनुभवायला मिळाले. मुळात जिवनावश्यक वस्तुंची दुकाने टाळेबंदीत सुरू राहणार आहेत. केवळ दुकानात न जाता मागणी नोंदवून माल मागविता येईल. किराणा दुकानातून घरपोच माल मिळणार आहे. भाजीपाला तसेच तत्सम वस्तूंची फिरत्या वाहनाद्वारे विक्रीला परवानगी आहे. असे असताना टाळेबंदीच्या भीतीने खरेदीसाठी झालेली गर्दी अनाठायी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

सटाण्याप्रमाणेच मालेगाव, चांदवड, कळवण, सिन्नर, नामपूर, मनमाड, येवला, पिंपळगाव, ओझर अशा प्रमुख ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. जिल्ह्य़ातील बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांपुढे शेतमाल विकण्याचे संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढता येईल, त्या प्रमाणात शेतमाल काढून मंगळवारी बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे बाजार समित्यांमध्येही  गर्दी झाली.