टंचाईमुळे केवळ सर्वसाधारण खाटांना मान्यता

नाशिक : पुरेशा प्रमाणात प्राणवायू पुरवठय़ाची हमी मिळत नाही, तोपर्यंत शहरात नव्याने करोना रुग्णालयांमध्ये केवळ सर्वसाधारण खाटांना परवानगी मिळणार आहे. या रुग्णालयांना प्राणवायूयुक्त खाटांना परवानगी मिळणार नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीच्या बैठकीत मांडली गेली. शहरात दैनंदिन किती प्राणवायू येतो याचे परीक्षण करण्यासाठी स्थायी समितीच्या सभेत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुरुवारी स्थायी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सभा पार पडली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, प्राणवायूच्या मुद्दय़ावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरात नव्या करोनाबाधितांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्या अनुषंगाने महिनाभरात अनेक खासगी रुग्णालये करोनासाठी आरक्षित केले गेले. सद्य:स्थितीत महापालिका आणि खासगी रुग्णालयात एकूण सात हजार खाटा आहेत. त्यातील १७८७ खाटा रिक्त आहेत. प्राणवायूयुक्त खाटांची संख्या २७७६ असून त्यातील ४५८ रिक्त असल्याचे मध्यवर्ती आरक्षण प्रणालीवर नमूद आहे.

अतिदक्षता विभागाच्या ८५५ (६६ रिक्त) आणि व्हेंटिलेटरयुक्त ६६३ (२९ रिक्त) अशी स्थिती आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात अनेक खासगी रुग्णालयांनी आपले रुग्णालय करोनामध्ये रूपांतरित करण्यासाठी महापालिककडे अर्ज केले आहेत. तथापि, प्राणवायूचा तुटवडा भासत असल्याने संबंधितांच्या प्राणवायूच्या खाटांना मान्यता देता येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. सद्य:स्थितीत नव्या रुग्णालयात सर्वसाधारण खाटांना परवानगी दिली जाईल. प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होईपर्यंत नव्या करोना रुग्णालयात प्राणवायूयुक्त खाटांना परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

प्राणवायूच्या परीक्षणासाठी समिती

शहरात दररोज किती प्राणवायू मिळतो याचे परीक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत अधिकारी, नगरसेवक यांचा समावेश राहील. प्राणवायू, सिलिंडरच्या मुद्दय़ावर बरीच चर्चा झाली. स्थायी समितीने डय़ुरा अर्थात मोठय़ा क्षमतेच्या सिलिंडरला मंजुरी दिली होती. हे सिलिंडर कुठे गेले, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयात झाकीर हुसेन रुग्णालयाच्या तुलनेत अधिक क्षमतेची प्राणवायूची टाकी आहे. या व्यवस्थेची पडताळणी करण्याची मागणी काहींनी केली.

साडेचार हजार रेमडेसिविर उपलब्ध

रेमडेसिविरच्या तुटवडय़ामुळे महापालिकेने मध्यंतरी आगावू पैसे भरून इंजेक्शनची मागणी नोंदविली होती. १० हजारपैकी आतापर्यंत साडेचार हजार रेमडेसिविर उपलब्ध झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली.