तोफखाना प्रशिक्षण केंद्र हेरगिरी प्रकरण

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक  : देवळाली कॅम्प येथील तोफखाना प्रशिक्षण केंद्र परिसरात हेरगिरी करणाऱ्या संशयिताकडून जप्त करण्यात आलेला भ्रमणध्वनी मुंबई येथील वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून संशयिताच्या घरातून सैन्यदलाचा गणवेश जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयिताच्या बँक व्यवहारात संशयास्पद काहीच नसून त्याच्या भ्रमणध्वनीत केवळ सैनिकी परिसरातील सेल्फीचे छायाचित्र आढळले आहे. ३० ऑक्टोबपर्यंत न्यायालयाने संशयितास पोलीस कोठडी सुनावल्याचेही पांडे यांनी सांगितले.

देवळाली कॅम्प येथील तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दोन ऑक्टोबर रोजी संजीवकुमार भगत (२१) हा सैनिकी परिसरातील काही छायाचित्रे भ्रमणध्वनीत काढत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याचा भ्रमणध्वनी काढून घेत त्याची तपासणी केली असता सर्व छायाचित्रे त्याने पाकिस्तानातील सलमान आणि अब्राहिम या व्हॉटसअप ग्रुपवर पाठविल्याचे लक्षात आले. त्याच्याविरूध्द दुसऱ्या दिवशी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजीवकुमारने ए. आर. कन्सट्रक्शन कंपनी यांच्यामार्फत देवळाली कॅम्प सैनिकी परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामासाठी कं त्राटी कामगार म्हणून आल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्याच्याकडील भ्रमणध्वनी आणि अन्य सामान जप्त केले. तो त्याच्या भावासोबत देवळाली कॅम्प येथे राहत होता.

पोलीस कोठडीत संजीवकुमारची दहशतवाद विरोधी पथक, केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग, गुप्तचर विभाग, सैनिकी विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्याच्या भ्रमणध्वनीत सैनिकी परिसरात स्वत: काढलेला सेल्फी आढळला. सैनिकी परिसरातील अन्य कुठलेही छायाचित्र आढळले नाही.संजीवकुमारने पाकिस्तानातील भ्रमणध्वनी क्रमांकासोबत केलेले व्हॉट्सअपवरील संभाषण मिळविण्यासाठी कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितले.