10 July 2020

News Flash

पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे

पंपावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सांगितले.

 

सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामीण पोलिसांची सूचना

नाशिक : जिल्ह्य़ातील लासलगांव येथील महिला जळीत प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्रामीण पोलिसांनी पेट्रोल पंप चालक आणि मालकांना बाटलीतून कोणालाही इंधन न देण्याची सूचना करतांनाच पंपावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सांगितले.

लासलगांव येथील बस स्थानक परिसरात घडलेल्या महिला जळीत प्रकरणात लासलगावच्या एका पेट्रोल पंपावरून प्लास्टिक बाटलीतून  पेट्रोल नेण्यात आल्याचे उघड झाल्याने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्य़ातील पेट्रोल पंप चालक आणि मालक, संबंधित संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्ह्य़ातील एकूण १५९ पंप चालक तसेच इतर पदाधिकारी, कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सिंह यांनी पेट्रोल पंप चालकांनी कोणत्याही ग्राहकांना प्लास्टिक बाटली, कॅनमध्ये पेट्रोल वा डिझेल देऊ नये, पंपावर पेट्रोल भरण्याच्या ठिकाणी तसेच पेट्रोल पंपात ये-जा करण्याच्या मार्गावर वाहनांचे क्रमांक तसेच वाहनातील चालक आणि इतर व्यक्ती स्पष्टपणे दिसतील अशा पध्दतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आग लागून जिवीत किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, पेट्रोल-डिझेल वितरण केल्यानंतर पंपावर जमा झालेले पैसे रोजच्या रोज बँकेत भरावेत, पैसे भरतांना योग्य ती काळजी घ्यावी, सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोल पंपावर योग्य त्या प्रमाणावर खासगी सुरक्षारक्षक नेमावेत, पंप चालविण्याबाबत शासनाने दिलेल्या सुचना आणि नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:34 am

Web Title: petrol pump cctv camera akp 94
Next Stories
1 विनाकरवाढ विकासकामे
2 बहुप्रतीक्षित बस सेवेला आगामी आर्थिक वर्षांचा मुहूर्त
3 ज्येष्ठ संघ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन
Just Now!
X