पुढील आठवडय़ापासून सुरूवात

नाशिक : उच्चभ्रूंची कॉलनी असो की, झोपडपट्टी परिसर असो, शहरात कुठेही डुकरांचा कळप मुक्तपणे भ्रमंती करताना दृष्टिपथास पडतो. खुलेआम भ्रमंती करीत शहराची प्रतिमा डागाळणाऱ्या या प्राण्याला आता कायमस्वरूपी हद्दपार करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर, आता खुद्द पालिकेचा पशू संवर्धन विभाग पुढील आठवडय़ापासून डुकरांना पकडून थेट ठार करणार आहे.

मागील वर्षी महापालिका क्षेत्रातील मोकाट डुकरे पकडणे, लिलाव पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणे यासाठी पालिकेच्या आरोग्य (पशुवैद्यकीय) विभागाने निविदा मागविली होती. मोकाट, उपद्रवी कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेचे खास पथक अस्तित्वात आहे. तशी व्यवस्था मोकाट डुक्कर पकडण्यासाठी नाही. त्यातही मोकाट म्हटली जाणारी बहुतांश डुकरे कोणाच्या ना कोणाच्या मालकीची असतात. डुक्कर पालन करणारे त्यावर उदरनिर्वाह करतात. संबंधितांमार्फत एखाद्या विशिष्ट जागेत सांभाळ करण्याऐवजी ती वेगवेगळ्या भागांत सोडून दिली जात असल्याचा पालिकेचा आक्षेप आहे. त्यामुळे झोपटपट्टी ते कॉलनी किंवा बाजारपेठ परिसरातही डुकरांचे कळप भटकताना दिसतात. डुक्कर खरेतर स्वच्छता राखणारा प्राणी. कचराकुंडी किंवा तत्सम घाण खाऊन तो स्वच्छता राखण्याचे काम करतो. मात्र घंटागाडी योजनेमुळे कॉलनी, वस्त्यांमधून कचराकुंडी कधीच लुप्त झाली. घराघरातील कचरा थेट घंटागाडीत जात असल्याने डुकरांना खाद्य मिळणेही अवघड झाले. या स्थितीत त्यांच्यामार्फत स्वच्छता कमी अन् उपद्रव अधिक झाल्याचा अनुमान नागरिकांच्या तक्रारींवरून काढला गेला आहे.

शहरात पहिल्यांदा मोकाट डुक्कर पकडण्याची प्रायोगिक तत्त्वावर राबविलेली मोहीम अयशस्वी ठरली. ठेकेदारामार्फत राबविलेल्या महिनाभराच्या कारवाईत एकही डुक्कर सापडले नसल्याचे पशू संवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. या कारवाईला बाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने विरोध केला होता. डुकरांवरील कारवाईमागे स्मार्ट सिटी योजनेचाही प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे संदर्भ आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनोखे प्रकल्प साकारताना डुकरांचे अस्तित्व चांगले दिसणारे नाही. या पाश्र्वभूमीवर, महापालिका अधिनियमातील तरतुदींच्या आधारे खुद्द पालिका कुठेही डुक्कर भ्रमंती करताना आढळल्यास मारण्याची कारवाई करणार आहे. मारून टाकलेल्या डुकराबद्दल भरपाई मिळण्यासाठी कोणाला दावा करता येणार नसल्याची कायद्यात म्हटले आहे. त्याचा आधार घेऊन महापालिका पुढील आठवडय़ात डुकरांना मारण्याचे काम हाती घेणार आहे.

सर्वत्र उपद्रव

डुकरांचा उपद्रव काही नवीन नाही. डुक्कर पालनास शहरात बंदी आहे. तरीदेखील काही व्यक्ती हा व्यवसाय करतात. त्यांच्यामार्फत डुकरे मोकाट सोडून दिली जातात. स्थानिकांना त्याचा त्रास

सहन करावा लागतो. डुक्कर घाणीत, कचराकुंडीवर भ्रमंती करणारा प्राणी असल्याने सर्वाना तो नकोसा वाटतो. मोकाट फिरणाऱ्या डुकरांबाबत नागरिक वारंवार तक्रारी करतात. महापालिका डुकरांच्या मालकाला नोटीस बजावते. या कारवाईनंतर काही काळ त्या भागातून डुकरे गायब होतात. पण कालांतराने पुन्हा दाखल होतात, असा अनुभव आहे. नोटीस बजावूनही फारसा उपयोग होत नसल्याने आता डुकरांना थेट ठार करण्यात येणार आहे.