पिंपळगाव बसवंत शहरात मोकाट जनावरे, कुत्रे यांचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम राबवून कुत्रे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे

पिंपळगाव शहरात अनेक वर्षांंपासून मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर आहे. शाळा, बस स्थानक, बाजारपेठ अशा सर्वत्र त्यांचा संचार असतो. यापूर्वी मोकाट जनावरांनी अनेकांना हल्ले करून जखमी केले आहे. मागील आठवडय़ात कुत्र्याच्या चाव्यामुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला. अशी परिस्थिती असतांनाही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिवाय शहरातून फिरतांना मनात भीतीही आणि दहशतही जाणवते. अनेकदा जनावरांच्या आपसातील झुंजीमुळे जनावरे रस्त्याने धावतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. दररोजच्या भाजीबाजारात आणि रविवारच्या आठवडे बाजारात जनावरांची घुसखोरी नित्याची झाली आहे. शिवाजीनगर, स्वामी समर्थ मंदिर परिसरात दिवसभर या जनावरांचा वावर असतो. याच भागात हायस्कूल, कन्या विद्यालय आहे. लहान मुलांचे दिवसभर शाळेत जाणे-येणे सुरू असते. मोकाट जनावरे या ठिकाणी हमखास ठाण मांडून असतात. मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एखाद्याला जीव गमवावा लागल्यासर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आहे

ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेकदा ग्रामसभेत  मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचा आणि ती गोशाळेत जमा करण्याचा तसेच त्यांच्या मालकावर कारवाई करण्याचा ठराव केला आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे भटक्या जनावरांचा मोठा त्रास नागरिकांना जाणवत आहे. मोकाट जनावरांची संख्या ६० ते ७० असेल. जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने याची गंभीर दखल घेऊन तातडीने या जनावरांचा बंदोबस्त करावा, जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे

मोकाट जनावरांचा शहरात मोठा वावर असून सर्वच भागात ही जनावरे फिरत असतात. यापूर्वी अनेक जण जनावरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने या जनावरांचा बंदोबस्त होणे शहराची गरज असून त्यादृष्टीने ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कृती करावी

– तानाजी बनकर (ज्येष्ठ नेते, पिंपळगाव बसवंत)