21 October 2019

News Flash

पिंपळनारे गावाची घनकचरा मुक्तीकडे वाटचाल

विद्यार्थ्यांनी कचरा प्रश्नावर काम करण्याआधी गावातील पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल तयार केला.

पिंपळनारे येथील ग्रामस्थांना कचरा विलगीकरणाविषयी अशा प्रकारे  मार्गदर्शन करण्यात आले.

पर्यावरण सेवा योजना विभागाचा उपक्रम

नाशिक : गावातील पर्यावरणविषयक प्रश्न समजून घेत त्यावर पर्याय शोधत ‘पर्यावरण सेवा योजना’ विभागाने दिंडोरी तालुक्यात ‘घनकचरा व्यवस्थापन’ संबंधित विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पिंपळनारे येथील पंडित धर्मा विद्यालयाने लोकसमुदाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाचा उपक्रम सुरू केला असून ग्रामस्थांना कापडी पिशवी, कचरा संकलित करण्यासाठी खोक्यांचे वाटप करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी लागावी, त्यांना प्रत्यक्ष काम करता यावे, प्रश्नाची उकल व्हावी तसेच त्यावर पर्यायही सांगता यावा यासाठी पर्यावरण सेवा योजना विभाग काम करीत आहे. पंडित धर्मा विद्यालयातील पर्यावरण सेवा योजनेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन उपक्रम हाती घेण्यात आला असून यासाठी दोन दिवसीय अनिवासी शिबीर घेण्यात आले. शिबिरास सरपंच मनीषा शेखरे, उपसरपंच अजित खांदवे यांसह इतर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कचरा प्रश्नावर काम करण्याआधी गावातील पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल तयार केला. गावात पडणारा पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक, गावातील कचरा प्रश्नावर सेंद्रिय खत उपक्रम सुरू करून पुढील टप्प्यात कचरा व्यवस्थापनावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. यासाठी गावातील जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावायची, याबाबत शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांंचे पाच गट तयार करून गावातील कचरा टाकण्याच्या ठिकाणांविषयी (उकिरडे) गावाचा नकाशा काढण्यात आला. विद्यार्थ्यांंनी प्रश्नावली च्या सहाय्याने कचरा विल्हेवाटविषयी गावाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रश्न विचारले. त्यामध्ये सध्या कचरा गोळा करण्याच्या व्यवस्थेची पाहणी करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट देण्यात आली. आरोग्य अधिकारी देवकर यांनी टाकाऊ जैववैद्यकीय औषधांची विल्हेवाट प्रRिया, आरोग्याच्या सुविधा याविषयी माहिती दिली.

ग्रामपंचायत कार्यालयात इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनासाठी ‘इ  कचरापेटी’ ठेवण्यात आली आहे. महिलांना घनकचरा व्यवस्थापन समजावे यासाठी ‘कचरा वर्गीकरण’ हा विषय खेळाच्या माध्यमातून समजून देण्यासाठी प्रकल्प अधिकारी जगदीश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने खेळ घेतला. यामध्ये भाज्यांचे देठ, फळांची साल, प्लास्टिक, कापड, लोखंड, थर्माकोल, ई-कचरा, जैववैद्यकीय कचरा, कागद यासारखा कचरा टाकण्यात आला. महिलांना त्याचे वर्गीकरण करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. घरामध्ये कचरा कशा पद्धतीने वेगळा करायचा, याविषयी माहिती दिली. जवळ ठेवलेल्या इ कचरा पेटीतील कचरा शास्त्रीय विल्हेवाटसाठी पुनप्र्रक्रिया संस्थेकडे पाठविला जाईल. जैववैद्यकीय कचऱ्याविषयी आरोग्य अधिकारी देवकर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. नागरिकांच्या शंकांचे समाधान केले. गावातील ५० कुटुंबाना कचरा संकलित करण्यासाठी खोके देण्यात आले. कुजणारा आणि न कुजणारा याप्रमाणे कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी पेटय़ांचे वाटप करण्यात आले.

First Published on January 4, 2019 3:39 am

Web Title: pimplenare village solid waste management initiative