नाशिककरांसह द्राक्ष शेतीवरील संकट टळणार

अनिकेत साठे, नाशिक

समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार जायकवाडीसाठी नाशिक, नगरमधून काही अंशी पाणी द्यावे लागणार आहे. मात्र ते नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह पालखेड धरण समूहातून सोडावे लागू नये म्हणून नियोजन करणे पाटबंधारे विभागाला क्रमप्राप्त ठरणार आहे. मराठवाडय़ाची १२ टीएमसीची मागणी आहे. नियमानुसार जायकवाडीला फार तर पाच टीएमसी पाणी दिले जाईल. उर्ध्व भागातील कोणत्या धरणांमधून किती प्रमाणात ते द्यावे लागेल याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. त्यात गंगापूर, पालखेडऐवजी दारणा, निळवंडे धरणांच्या पर्यायावर विचार सुरू आहे. गंगापूरमधून पाणी सोडण्याची वेळ न आल्यास शहरासह द्राक्ष शेतीवरील संभाव्य संकट आपसूक टळणार आहे.

नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा यांच्यातील पाणी संघर्ष दुष्काळी स्थितीमुळे पुन्हा एकदा पेटला आहे. गंगापूरमधून पाणी सोडण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विरोध होत असून ‘भाजप’च्या आमदार देवयानी फरांदे यांनी सर्वपक्षीय मोट बांधून जन आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी दिल्यास नाशिककरांना झळ बसेल. गंगापूरमधून पाणी सोडल्यास टंचाईसह द्राक्ष शेती संकटात सापडेल. तशीच स्थिती पालखेड धरण समुहाची आहे. मनमाड, येवल्याची तहान भागविणाऱ्या या धरणावर ओझर, पिंपळगावसह इतर पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे.

या पाश्र्वभूमीवर, पाणी देणे अनिवार्य ठरल्यास पाटबंधारे विभाग ज्या धरणात काहीअंशी वाढीव पाणी आहे, तेथून त्याची पूर्तता करता येऊ शकते. उर्ध्व भागात गंगापूर, दारणा, पालखेड, प्रवरा, मुळा, भंडारदरा धरण समूह आहेत. जायकवाडीसाठी पाणी देताना त्यातील काही पाणी वापरता येईल. जेणेकरून गंगापूर किंवा पालखेड धरणांमधून पाणी सोडावे लागणार नाही.

दारणा, निळवंडे हे पर्याय

नाशिक,नगरमधून किती पाणी सोडावे, याबद्दलचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दारणा धरण समूहात सध्या १७ टीएमसी पाणी असून त्यातील १० टीएमसी पाणी मराठवाडय़ातील अन्य भागात एक्स्प्रेस कालव्यासाठी आरक्षित आहे. उर्वरित सात टीएमसी पाण्यावर अन्य नियोजन आहे. या धरणातून काही पाणी दिल्यास गंगापूरमधून पाणी सोडावे लागणार नाही. तशीच स्थिती प्रवरा धरण समूहातील निळवंडे धरणाची आहे. उपरोक्त धरणाच्या कालव्याचे काम झालेले नाही. परिणामी मागील हंगामात अडीच टीएमसी पाणी स्थानिक पातळीवर अतिरिक्त उपलब्ध झाले. या दोन्ही धरणांमधून काही अंशी जायकवाडीला पाणी दिल्यास गंगापूर, पालखेड धरणातून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही.