23 October 2020

News Flash

उद्योगांना अत्यल्प प्राणवायू देण्याचे नियोजन

पन्नास लहान-मोठय़ा उद्योगांना प्राणवायूची गरज, प्रशासनाची कसोटी

पन्नास लहान-मोठय़ा उद्योगांना प्राणवायूची गरज, प्रशासनाची कसोटी

नाशिक : करोनावरील उपचारात टंचाई भेडसावू नये म्हणून प्राणवायूचा औद्योगिक कारणासाठी थांबविलेला वापर काही अंशी का होईना, पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे. औद्योगिक वसाहतीतील लहान-मोठय़ा सुमारे ५० उद्योगांना प्राणवायूची गरज भासते. सध्या जिल्ह्यात वैद्यकीय कारणास्तव चार हजार प्राणवायूच्या सिलिंडरची मागणी आहे. तर दररोज पाच हजार सिलिंडरचा पुरवठा होत आहे. यातील अतिरिक्त सिलिंडरचा साठा (बफर स्टॉक) केला जात असून तो तीन हजार सिलिंडरवर पोहचला आहे. काही कारणास्तव पुरवठय़ात अडचणी उद्भवल्यास वैद्यकीय पुरवठा सुरळीत राखण्यासाठी तो महत्वाचा आहे. या स्थितीत कमी प्रमाणात प्राणवायू लागणाऱ्या आणि जास्त कामगार असलेल्या उद्योगांना प्राणवायू देऊन औद्योगिक उत्पादन प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी मध्यमार्ग काढतांना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय उपचारात प्राणवायुच्या निर्माण झालेल्या तुटवडय़ावर प्रशासनाने दोन आठवडय़ांपूर्वी औद्योगिक क्षेत्रातील पुरवठा वैद्यकीय क्षेत्राकडे वळविण्याचा निर्णय घेतला होता. करोनावरील उपचारासाठी मोठय़ा प्रमाणात प्राणवायुची गरज भासत आहे. त्यामुळे उद्योगांना होणारा प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी प्राणवायू पुनर्भरण करणाऱ्या घटकांना दिले होते. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, उद्योग, संघटना यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले.

प्रशासनाच्या निर्णयामुळे ज्या धातू प्रक्रिया उद्योगात प्राणवायुची गरज भासते ते अडचणीत आले. याचा परिणाम अडीच हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होईल. धातू उद्योगांना किमान २० टक्के प्राणवायू पुनर्भरण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि उद्योग मंत्र्यांकडे आधीच केलेली आहे.

करोनामुळे जिल्ह्यातील उद्योग आधीच अडचणीत असून ते कशा पध्दतीने चालवावे हा गंभीर प्रश्न सर्वासमोर आहे. उद्योगांना २० टक्के प्राणवायुचा पुरवठा केल्यास ते बंद करण्याची वेळ येणार नाही, याकडे निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी लक्ष वेधले होते.

जिल्ह्यात करोनाचे सध्या साडेसात हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील साधारणत: १५ टक्के रुग्णांना प्राणवायूची गरज भासते. दोन ते तीन आठवडय़ांच्या तुलनेत प्राणवायूची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या २०० ते ३०० ने कमी झाली आहे. जिल्ह्याची प्राणवायुची गरज दैनंदिन चार हजार सिलिंडरची आहे, तर दैनंदिन पाच हजार सिलिंडरचा पुरवठा होतो. अलीकडेच दोन दिवस एका पुरवठादाराकडून पुरवठा झाला नव्हता. अकस्मात अशा काही अडचणी उद्भवल्यास पुरवठय़ात खंड पडू शकतो. यामुळे प्रशासनाने अतिरिक्त साठा करण्यावर भर दिला आहे. जिल्हा उद्योग केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सध्या तीन हजार सिलिंडरची साठवणूक करण्यात आली आहे. प्राणवायुची निकड भासणारे लहान-मोठे सुमारे ५० उद्योग आहेत. यातील बहुतेकांनी काही अंशी प्राणवायू मिळावा म्हणून जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केले असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी सांगितले.

दैनंदिन पुरवठा आणि वैद्यकीय गरज यामध्ये काही प्रमाणात अतिरिक्त ठरणाऱ्या सिलिंडरमधील काही उद्योगांना देता येईल का, याची चाचपणी प्रशासन करत आहे. वैद्यकीय कारणास्तव कधी मागणी वाढेल याची शाश्वती नाही. उद्योग सुरळीत राखण्यासाठी त्यांना काही प्रमाणात प्राणवायू दिला आणि नंतर वैद्यकीय गरज वाढली तर काय करायचे, असा प्रश्नही यंत्रणांना भेडसावत आहे.

सध्या प्राणवायूच्या वापरावर योग्य नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले आहे. तसेच प्राणवायूचे उत्पादन वाढवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. आता जे उद्योग प्राणवायूूचा अतिशय कमी वापर करतात, त्यांना परवानग्या दिल्या जात आहेत. ज्यांना परवानगीची गरज आहे, त्या उद्योगांनी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. प्राणवायूचा अत्यल्प वापर आणि जास्त कामगार अशा उद्योगांना प्राधान्याने मंजुरी दिली जाईल. वैद्यकीय कारणास्तव प्राणवायूचा पुरवठा ही कायम सर्वोच्च प्राधमिकता राहील.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 2:22 am

Web Title: planning to give the industry very little oxygen zws 70
Next Stories
1 नव्या कायद्याद्वारे शेती मोठय़ा उद्योगांच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र
2 करोना काळात पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांची चौकशी होणार
3 ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Just Now!
X