आणीबाणी प्रसंगी अग्निशमन केंद्राचा उपयोग उद्योग क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांना देखील होणार असल्याची माहिती उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. शुक्रवारी सकाळी अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले.  मालेगाव येथे वस्त्रोद्योगाबरोबर प्लास्टिक पार्क उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अन्बलगन, मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक, विक्रम सारडा आदी उपस्थित होते.

सुसज्ज तयार झालेले अग्निशमन केंद्र लवकर सुरु करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने १६ कर्मचारी आणि एक वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दुसरे वाहन सहा महिन्यात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्यादृष्टीने उद्योजकांनी वेळेत आपल्या यंत्रांची तपासणी करुन घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी अमरावतीच्या धर्तीवर मालेगांव येथे दुसरे ‘टेक्सटाईल पार्क’ तसेच  प्लास्टिक संशोधन आणि पुनप्र्रक्रिया यासाठी ‘प्लास्टिक पार्क’ उभारण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

औद्य्ोगिक क्षेत्र विकासाच्यादृष्टीने मालेगांव सोबत दिंडोरी येथील उद्योगांना चालना मिळण्यासाठी भूखंड वाटप करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये उद्योग क्षेत्रातील प्रदर्शन केंद्र उभारणीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे औरंगाबादच्या धर्तीवर औद्य्ोगिक वसाहत विकसित करावी, असेही देसाई यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या केंद्राचा उपयोग अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना होणार असल्याचे आमदार हिरे यांनी नमूद केले. आगीसारख्या आपत्तीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन केंद्र बांधण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात होती. केंद्राच्या लोकार्पणामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे हिरे यांनी सांगितले. यावेळी निमा, आयमा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.