उद्योग सचिव सुनील पोरवाल यांची स्पष्टोक्ती

नाशिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शविणाऱ्या उद्योगांना महिनाभरात दिंडोरी औद्योगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उद्योग विभागाचे मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाला प्राधान्य दिले आहे. या पाश्र्वभूमीवर, संरक्षण दलाशी संबंधित साहित्य निर्मितीसाठी राज्यात पाच विभाग तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिकचाही अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले.

दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेले उद्योग विभागाचे सचिव पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सातपूरच्या निमा हाऊस येथे बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य अधिकारी रमेश सुरवाडे, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, उद्योग विकास विभागाचे सहसंचालक पी. पी. देशमुख, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगांसमोरील अडचणी मांडल्या. नाशिकमध्ये नव्याने उद्योग उभारू इच्छिणाऱ्या आणि विस्तारीकरणाचा विचार करणाऱ्या उद्योगांसमोर जागेची कमतरता हाच मुख्य मुद्दा आहे. निमाच्या वतीने मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्रमात तब्बल दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. संबंधित उद्योगांना जागा मिळत नसल्याने ही प्रक्रिया रखडल्याची बाब पाटणकर यांनी निदर्शनास आणली.

या संदर्भात पोरवाल यांनी दिंडोरी आणि मालेगाव औद्योगिक वसाहतीसाठीची भूसंपादन प्रक्रिया बऱ्याच अंशी पूर्ण झाल्याचे नमूद केले. उपरोक्त ठिकाणी रस्ते, पाणी, वीज विविध सुविधांची उपलब्धता करण्यात येत आहे. दिंडोरी येथे पाण्यासह इतर सुविधांची कामे पूर्ण करावीत, अशी सूचना करण्यात आली. महिनाभरात भूखंडांचे वाटप उद्योजकांना सुरू करावे, असे निश्चित करण्यात आले.

संरक्षण दलाच्या अनेक आस्थापना नाशिकमध्ये आहेत. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात संरक्षण दलाशी निगडित सामग्री देशांतर्गत तयार व्हावी, असा प्रयत्न आहे. संरक्षण दल सामग्री खरेदीवर दरवर्षी मोठा खर्च करते. संरक्षण दलाशी निगडित उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यात पाच ठिकाणे ‘डिफेन्स’ संबंधित उद्योगांच्या विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत.

त्यामध्ये नाशिकचाही अंतर्भाव असल्याचे पोरवाल यांनी सांगितले. १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई येथे मेक इन इंडियाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये संरक्षण दलाच्या सामग्रीशी निगडित, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकीसह पर्यटनाशी निगडित उद्योगांना चांगली संधी आहे. यादृष्टीने गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

दिंडोरी औद्योगिक वसाहतीची सद्य:स्थिती

यंत्रमागाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव तालुक्यात ३४५ हेक्टर क्षेत्रावर टेक्सटाइल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. या परिसरात शेती महामंडळाची ४३५ हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतली आहे. याशिवाय या जागेलगतची आणखी काही जागा उपलब्ध होऊ शकते. मुंबईलगतच्या भिवंडी येथे वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र आहे. पर्यावरणविषयक नियमावलीमुळे त्या उद्योगांसमोर काही प्रश्न उभे आहेत. त्या ठिकाणी उद्योग विस्तारण्यासाठी जागेची कमतरता आहे. या एकंदर स्थितीत मालेगाव येथे विकसित होणारे वस्त्रोद्योगाचे केंद्र चांगला पर्याय ठरणार असल्याचे पोरवाल यांनी सांगितले. भिवंडीतील उद्योजक आपला विस्तार या ठिकाणी करू शकतील. मालेगावमध्ये आधीपासून यंत्रमाग उद्योग कार्यरत आहे. या ठिकाणी उद्योगासाठी आवश्यक कामगारही उपलब्ध आहे. या स्थितीत भिवंडीतील उद्योगांना मालेगावच्या केंद्रात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अनुषंगाने मालेगावच्या टेक्सटाइल पार्कला गती दिली जाणार असल्याचे पोरवाल यांनी नमूद केले.

मालेगावमध्ये ‘टेक्स्टाइल पार्क’

यंत्रमागाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव तालुक्यात ३४५ हेक्टर क्षेत्रावर टेक्स्टाइल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. या परिसरात शेती महामंडळाची ४३५ हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतली आहे. याशिवाय या जागेलगतची आणखी काही जागा उपलब्ध होऊ शकते. मुंबईलगतच्या भिवंडी येथे वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र आहे. पर्यावरणविषयक नियमावलीमुळे त्या उद्योगांसमोर काही प्रश्न उभे आहेत. त्या ठिकाणी उद्योग विस्तारण्यासाठी जागेची कमतरता आहे. या एकंदर स्थितीत मालेगाव येथे विकसित होणारे वस्त्रोद्योगाचे केंद्र चांगला पर्याय ठरणार असल्याचे पोरवाल यांनी सांगितले. भिवंडीतील उद्योजक आपला विस्तार या ठिकाणी करू शकतील. मालेगावमध्ये आधीपासून यंत्रमाग उद्योग कार्यरत आहे. या ठिकाणी उद्योगासाठी आवश्यक कामगारही उपलब्ध आहे. या स्थितीत भिवंडीतील उद्योगांना मालेगावच्या केंद्रात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अनुषंगाने मालेगावच्या टेक्स्टाइल पार्कला गती दिली जाणार असल्याचे पोरवाल यांनी नमूद केले.