अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठीचीही खरेदी

नाशिक : दरात चढ-उतारांची शृंखला सुरू असली तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोने-चांदी खरेदीमुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सराफा बाजार झळाळून गेल्याचे पाहावयास मिळाले. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे, लग्नसराईच्या खरेदीसाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त निवडून अलंकार खरेदी करणारे ग्राहकही होते.

अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक. या दिवशी ग्राहकांकडून प्रामुख्याने चोख स्वरूपात सोने-चांदे खरेदीला प्राधान्य दिले जाते. वर्षभराच्या काळात या दिवशी सोन्या-चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात असल्याने त्याचे दर किमान या दिवशी तरी चढेच राहतात, असा आजवरचा अनुभव. या वर्षी मात्र त्यास छेद मिळाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

काही महिन्यांपूर्वी ३५ हजार रुपये प्रति तोळा असणारे सोने मंगळवारी ३१ हजारापर्यंत खाली आले. चांदीचे भावही कमी असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचे प्रत्यंतर अगदी भल्या सकाळपासून पाहावयास मिळाले. नाशिककरांना आकर्षित करणाऱ्या नामांकित सराफ व्यावसायिकांच्या पेढय़ांत ग्राहकांसाठी घडनावळीवर सवलत, सोडत, आकर्षक भेटवस्तू, पैठणी यासह अन्य विशेष सवलतींचा वर्षांव करण्यात आला. सोने-चांदी खरेदीत असणारा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम राहिला.

नाशिक येथील आर. सी. बाफना, राजमल लखीचंद, महावीर ज्वेलर्स, भंडारी ज्वेलर्स, आडगावकर आणि टकले सराफ, जाखडी ज्वेलर्स, नाशिकरोडस्थित दंडे ज्वेलर्स अशा बडय़ा पेढय़ांमध्ये ‘हॉलमार्क’ असणारे चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल राहिला. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी आणि बिस्किटांचा समावेश होता.

ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी गुंतवणूक म्हणून मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असला तरी यंदा त्याच्या जोडीला पुढील दोन महिने लग्नसराईचे लाभल्याने या दिवशी अलंकार खरेदीलाही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्याचे सराफा व्यावसायिक राजेंद्र ओढेकर यांनी सांगितले. लग्नसराईनिमित्त पारंपरिक दागिन्यांसह चित्रपट-मालिकेतील विशेष अलंकारांची मागणी लग्नानिमित्त नोंदविण्यात आली. काहींनी स्वतसाठी वेगवेगळ्या धाटणीचे दागिने केल्याचे ओढेकर म्हणाले.